वाशिम : जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे २२ हजार १३३ शेतकऱ्यांच्या १९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी १५.१८ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला मिळाला असून, सदर नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. यासाठी तलाठ्यांमार्फत शेतकऱ्यांकडून बँक खाते क्रमांक व आधार क्रमांकाची माहिती घेतली जात आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वाशिम जिल्ह्यातील रब्बी पिकांसह फळबागा, भाजीपाला आदींचे अतोनात नुकसान झाले होते. महसूल, कृषी व पंचायत विभागाने नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले जिरायत पिकाखालील क्षेत्र १२ हजार ४७५ हेक्टर असून यामुळे १२ हजार ७०६ शेतकरी बाधीत झाले. या शेतकऱ्यांना हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत दिली जाणार असून त्यासाठी ८ कोटी ४८ लाख २८ हजार ८४४ रुपये निधी मिळाला आहे. याशिवाय बागायती पिकाखालील नुकसान झालेले क्षेत्र ७२४ हेक्टर असून १२७६ शेतकरी बाधीत झाले आहेत. त्यांना १३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर मदत मिळण्याकरिता ९७ लाख ७५ हजार ७५५ रुपयांचा निधी मिळाला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे फळपिकांचेही नुकसान झाले. एकूण २२ हजार १३३ शेतकऱ्यांच्या १९ हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसानभरपाईसाठी १५ कोटी १८ लाख ७७ हजार रुपयाच्या निधीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासन दरबारी पाठविला होता. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला नुकसानभरपाईचा १५ कोटी १८ लाख ७७ हजार रुपयाचा निधी प्राप्त होताच, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तातडीने हा निधी तहसिल कार्यालयांकडे सुपूर्द केला.
वाशिम तालुक्यातील गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी १ कोटी ४९ लाख ३० हजार ६३० रुपयाचा निधी देण्यात आला आहे. मालेगाव तालुक्यात एक कोटी ५६ लाख ७८ हजार ४७० रुपये, रिसोड तालुक्यात ११ कोटी १४ लाख ९२ हजार २८० रुपये, मंगरूळपीर तालुक्यात २८ लाख ५४ हजार ७२० रुपये, मानोरा तालुक्यात ४३ लाख २० हजार ९०० रुपये असा एकूण १५ कोटी १८ लाख ७७ हजार रुपयाचा निधी मिळाला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात मदत निधी दिला जाणार असल्याने गावपातळीवर तलाठ्यांमार्फत संबंधित शेतकºयांकडून बँक खाते व आधार क्रमांकाची माहिती घेतली जात आहे. संबंधित शेतकºयांना तहसिल कार्यालयातदेखील बँक खाते व आधार क्रमांकाची माहिती देता येणार आहे. बँक खाते व आधार क्रमांकाची पडताळणी केल्यानंतर तातडीने नुकसानभरपाईची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.