लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तथापि, बँकांमध्ये गर्दी होत असल्याने कोरोनाचा धोका कायम आहे. बँकांमधील गर्दी टाळण्याचा प्रयत्न म्हणून राष्ट्रीयीकृत बँक खात्यातील १० हजार रुपयांपर्यंत रक्कम घरबसल्या काढण्याची सुविधा डाक विभागामार्फत नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन बँकेत होणारी गर्दी टाळावी, असे आवाहन डाक विभागामार्फत करण्यात आले आहे.संचारबंदी काळात डाक विभागामार्फत जनतेला बचत बँक सुविधा, टपाल वाटप, रजिस्टर बुकिंग, स्पीड पोस्ट बुकिंग या सुविधांसोबतच राष्ट्रीयीकृत बँक खात्यातून १० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढून पोस्टमनमार्फत अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणाऱ्या नागरिकांना आपल्या खात्यातून घरबसल्या रक्कम काढावयाची असल्यास त्यांनी आपल्या नजीकच्या पोस्ट कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत आपले नाव, पत्ता व मोबाइल क्रमांक व आवश्यक असलेल्या रकमेची माहिती नोंदवावी. त्यानंतर पोस्टमन संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन बँक खात्यातून रक्कम काढून अदा करण्याची कार्यवाही करेल, असे डाक विभागामार्फत कळविण्यात आले आहे. दरम्यान, बँकेतील गर्दी टाळण्यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, हे विशेष. याची दखल म्हणून राष्ट्रीयीकृत बँक खात्यातील १० हजार रुपयांपर्यंतची रक्कम घरबसल्या काढण्याची सुविधा डाक विभागाने उपलब्ध करून दिली असून, नागरिक या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घेतात यावर बँकांमधील गर्दीचे चित्र अवलंबून राहणार आहे. यासंदर्भात काही अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहनही डाक विभागाने केले आहे.