शिरपूर जैन : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०१७ असून शेतकºयांची होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी रविवार, ३० जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व बँका सुरू आहेत. मात्र, या बँकांना शेतकºयांची प्रतीक्षा असल्याचे शिरपूर परिसरात दिसून येत आहे.
खरीप हंगामाकरिता नऊ पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. यामुळे पेरणीपासून ते कापणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्ती, पावसाचा खंड, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकºयांना नुकसान भरपाई मिळणार आहे. ३१ जुलै पूर्वी पीक विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले. पीक विमा योजनेचा हप्ता भरण्यासाठी बँकेत गर्दी होऊ नये, याकरिता जिल्ह्यातील ‘आपले सरकार सेवा केंद्र’मध्ये विमा हप्ता स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध आहे तसेच रविवार हा सुट्टीचा दिवस असतानाही बँका सुरू ठेवण्यात आल्या. मात्र, शिरपूर परिसरातील बँक आॅफ महाराष्ट्र व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपूर येथील शाखेत दुपारी १२.४५ वाजेपर्यंत एकही शेतकरी आला नसल्याचे चित्र होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपूर शाखेत आतापर्यंत केवळ १५३० शेतकºयांनी पीक विमा उतरविला आहे. रविवारी बँक आॅफ महाराष्ट्र शाखा शिरपूर व जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा शिरपूर येथे शुकशुकाट दिसून येत आहे.