लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : मांगल्य, पावित्र्य आणि उत्साहाचे प्रतीक असणार्या गणरायाला जिल्ह्यात तीेन टप्प्यात निरोप देण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात मंगळवार, ५ सप्टेंबर रोजी वाशिम, कारंजा व रिसोड शहरासह मालेगाव आणि कारंजा तालुक्यातील काही गावांत उत्साह व शांततेत विसर्जन झाले. ढोल-ताशांच्या निनादात व ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, अशा जयघोषात विघ्नहर्ता गणरायांला भाविकांनी जड अंत:करणाने निरोप दिला. ‘गणपती बाप्पा’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेले होते. वाशिम येथे मंगळवारी सकाळपासूनच गणरायास निरोप देण्यासाठी गणेशभक्तांची लगबग सुरू झाली होती. सकाळी ८.३0 वाजताच्या सुमारास स्थानिक शिवाजी चौकात शिवशंकर गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीचे पूजन झाले. यावेळी खासदार भावना गवळी, माजी आमदार विजय जाधव, नगराध्यक्ष अशोक हेडा, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण इंगोले, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे, दिलीप जोशी, गोविंदा रंगभाळ, राजू रंगभाळ, गजानन भांदुर्गे, नागोराव ठेंगडे, गणेश विसर्जन मिरवणूक समितीचे अध्यक्ष गणेश गाभणे, जुगलकिशोर कोठारी, अबरार मिर्झा, अकीलभाई मिस्त्री, माणिक देशमुख, धनंजय हेंद्रे, नीलेश पेंढारकर, वसंतराव धाडवे, भानुप्रतापसिंग ठाकूर, रूपेश वाघमारे आदींची उपस्थिती होती. विसर्जन मिरवणुकीला नारळ फोडून सुरुवात झाली. यावेळी शिवशंकर गणेश मंडळाकडून ढोल-ताशे वाजविण्यास सुरुवात झाली. मान्यवरांसह सर्वांचीच पावले ढोल-ताशांच्या तालावर विद्युत वेगाने थिरकायला लागली. या उत्साहात मिरवणूक शिवाजी चौकातून पुढे निघाली. सकाळी ८.३0 वाजतापासून सुरू झालेली ही मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यादरम्यान, गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. दरम्यान, गणेशभक्तांच्या सुविधेसाठी नगरपालिकेने शहरात पाच किलोमीटर अंतरात बॅरिकेट्स, तर ९५ सीसी कॅमेरे लावले होते. गणेशभक्तांसाठी अनेक संघटना, मान्यवर आदींनी ठिकठिकाणी फराळाची, चहाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वजण दक्षता बाळगून होते. सर्वांच्या सहकार्यातून गणेश विसर्जन मिरवणूक उत्साह अन् शांततेत पार पडली. जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत शहरी भागात २४५, तर ग्रामीण भागात ४४१ अशा एकंदरीत ६८६ सार्वजनिक गणेश मंडळांकडून ‘श्रीं’ची स्थापना करण्यात आली होतीे. यापैकी २१0 गावांत ‘एक गाव-एक गणपती’ची संकल्पना राबविण्यात आली. दरम्यान, पोलिसांवरील ताण कमी व्हावा, कुठेही अनुचित घटना घडू नये, याकरिता ५ ते ७ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात तीन टप्प्यात गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असून, पहिल्या दिवशी ५ सप्टेंबर रोजी वाशिम, रिसोड, कारंजा शहरासह मालेगाव आणि मंगरुळपीर तालुक्यातील ग्रामीण भागांत गणेशमूर्तींंचे विसर्जन करण्यात आले, तर पुढील दोन दिवसांत उर्वरित ठिकाणी विसर्जन मिरवणका निघणार आहेत.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात पार पडलेल्या गणेश विसर्जन सोहळय़ात वाशिम, कारंजा आणि रिसोड शहरासह मालेगाव ग्रामीण आणि कारंजा ग्रामीण भागांत तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कारंजा शहरासह ग्रामीण भागांत अपर पोलीस अधीक्षक सपना गोरे व पोलीस उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले व राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनात दोन पोलीस निरीक्षक १८ इतर अधिकारी व १५७ पोलीस कर्मचारी, ४५ होमगार्ड तसेच एसआरपी तैनात करण्यासह दंगा नियंत्रण पथकातील २४ कर्मचारी असे एकूण २४६ पोलीस कर्मचार्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रिसोड शहरात ४ पोलीस निरीक्षक, सहा उपनिरीक्षक, १0२ पोलीस कर्मचारी, सीआरपीएफच्या दोन तुकड्यांसह २८ होमगार्ड तैनात करण्यात आले होते. मंगरुळपीर तालुक्यात ५ सप्टेंबर रोजी ४0 गावांपैकी सात गावांनी पोलीस बंदोबस्त नाकारला, तर ३३ गावांत प्रत्येकी एक हे.काँ. किंवा कॉन्स्टेबलसह दोन होमगार्ड तैनात करून गणरायांना शांततेत निरोप देण्यात आला. मालेगाव ग्रामीण भागातही तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
वाशिममध्ये ९५, तर कारंजात २७ सीसी कॅमेरेगणेश विसर्जन शांततेत पार पडावे आणि या विसर्जन सोहळय़ादरम्यान अनुचित प्रकार करणार्यांवर वचक असावा, तसेच घडलेल्या घटनांची माहिती मिळून कार्यवाही करता यावी, या उद्देशाने पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनात कारंजा आणि वाशिम शहरात विसर्जन मार्गावर सीसी कॅमेरे बसविण्यात आले होते. यात वाशिम शहरातील विसर्जन मार्गावर ९५, तर कारंजा शहरातील विसर्जन मार्गावर २७ सीसी कॅमेरे बसविण्यात आले होते. पोलीस प्रशासनाच्यावतीने सतत यातील फुटेजची पाहणी करण्यात येत होती.
दुसर्या टप्प्यात मानोरा, मंगरुळपीर, मालेगावात विसर्जन मिरवणूकपहिल्या टप्प्यात वाशिम, कारंजा आणि रिसोड शहरात चोख बंदोबस्तात गणेश विसर्जन पार पडल्यानंतर दुसर्या टप्प्यात मंगरुळपीर शहर आणि ग्रामीण भागातील काही गावे, तसेच मानोरा आणि मालेगाव शहरात गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. यासाठीही पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, संभाव्य अनुचित घटनांवर नियंत्रणासाठी विशेष पथकेही नियुक्त करण्यात येणार आहेत. दरम्यान, विसर्जन मिरवणुकीत रसायनयुक्त, अनैसर्गिक गुलाल वापरणे टाळावे. मोठय़ाने वाजणार्या, जास्त ध्वनिप्रदूषण होणार्या डीजेसारख्या तत्सम वाद्यांचा वापर टाळावा. लहान मुलांना मिरवणुकीत सहभागी करून घेऊ नये, काही कारणांनी लहान मुले मिरवणुकीदरम्यान हरवल्यास तत्काळ पोलीस मदत केंद्रांवर सूचित करावे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी किंवा समाजघटकांनी अफवा पसरवू नयेत. पोलीस यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणांना विचारणा करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. े-