वाशिम, दि. 30 - काळा पैसा व भ्रष्टाचाराचे निर्मुलन करण्यासाठी सर्वांनी ‘ऑनलाईन’ किंवा ‘मोबाइल बँकिंग’द्वारे व्यवहार करुन ‘डिजिटल पेमेंट’च्या विविध पर्यायांचा अवलंब करावा. डिजिटल इंडिया, नव्या युगाकडे मार्गक्रमण करीत असल्याबाबतचा संदेश देणा-या श्री गणेशाची स्थापना नगरपरिषदेच्यावतीनं करण्यात आली आहे. विशेष म्हणजे येथे याबाबत प्रोजेक्टरव्दारे जनजागृतीदेखील करण्यात येत आहे. डिजिटल इंडियाचा संदेश देणारा गणेश शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. वाशिम नगरपरिषदेच्यावतिने मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या कल्पकतेतून व मार्गदर्शनातून पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणपती बाप्पाची मूर्ती साकारण्यात आली असून डिजिटल इंडियाचा संदेश देण्याबाबत अधिकारी व कर्मचा-यांशी चर्चा करण्यात आली होती. अधिकारी व कर्मचारी यांनी या कल्पनेचे स्वागत करुन ‘डिजिटल इंडिया’ चा संदेश देणारा गणेशाची स्थापना करुन त्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. स्थापन करण्यात आलेल्या गणेशाच्या मूर्तीच्या हातामध्ये डेबीट, क्रेडीट कार्डचा गठ्ठा, पॉस मशिन, लॅपटॉप व मोबाइल देण्यात आला आहे. याबाबतीच माहिती सांगणारे फलक देखाव्यात मांडण्यात आले आहेत.
‘डिजिटल इंडिया’चा संदेश देणारा वाशिममधील बाप्पा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2017 5:31 PM