वाशिम : परमिटरुम हाॅटेलमध्ये विकणाऱ्या वाईनवर महाराष्ट्र राज्य शासनाने ५ टक्के व्हॅट वाढविला असून ताे आता १० टक्के झाला आहे. आधिच संकटात असलेल्या या व्यावसायिकांना हे अडचणीचे ठरत असून हा व्हॅट टॅक्स कमी करावा या मागणीसाठी जिल्हयातील सर्वच दुकानदारांनी (बार) १६ नाेव्हेंबर राेजी बंद ठेवून या निर्णयाचा निषेध नाेंदविला.
वाढीव व्हॅट टॅक्सच्या निषेधार्थ बंद पाळून जिल्हाधिकारी यांना वाशिम जिल्हा बार ॲन्ड लिकर्स असाेशियशन रिसाेडच्यावतिने निवेदन देण्यात आले. या निवेदनात वाशिम जिल्हयात वाशिम, रिसाेड, मालेगाव, शिरपूर, मंगरुळपीर, मानाेरा, कारंजा, शेलुबाजार येथे परमिटरुम हाॅटेल माेठया प्रमाणात आहेत. परमिटरुमध्ये विकणाऱ्या वाईनवर व्हॅट वाढविल्याने आधिच गत ५ वर्षांपासून आर्थिक संकटात असलेले व्यावसायिक अडचणीत आले आहेत. शासनाने परमिट रुम वर लावलेला १० टक्के व्हॅट हटवून उत्पादन स्त्राेतावर लावावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
राज्यात १८ हजार परमिटरुमधारक या व्यवसायावर अवलंबून आहेत. व्हॅट वाढवून आमच्यावर अन्याय करण्यात आला असून या वाढीव व्हॅटमुळे आता तस्करी वाढून परराज्यातील दारु महाराष्ट्रात मुक्तपणे येण्यास सुरुवात हाेण्याची शक्यता आहे.यामध्ये शासनाचे फार माेठे नुकसानही हाेणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. तसेच न्याय देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष भागवत गाभणे, उपाध्यक्ष जुगल जैस्वाल, रमेश जैस्वाल, सचिव गुरुबक्ष रामवाणी, शंकर इंगाेले, सहसचिव सुभाष राठाेड, काेषाध्यक्ष भावनदास जिवनाणी, सदस्य मुलचंद ओझा, सुनील गाडगे, विठ्ठल आंधळे, राजकुमार बगडे आदि उपस्थित हाेते.