लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा करताना राज्य सरकारने निराधारांना प्रत्येक एक हजार रुपये देण्याची घोषणा १३ एप्रिल रोजी केली होती. मात्र, त्यावर २२ दिवसांचा कालावधी उलटूनही जिल्ह्यातील ९७ हजार ६३८ निराधारांना अद्याप ही मदत मिळालेली नाही.
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापूर्वी निर्बंध कडक करण्यात आले होते. मात्र, कोेरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने १३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंध अधिक कठोर करण्याची घोषणा केली होती. मिनी लॉकडाऊनमुळे निराधारांना थोडाफार दिलासा म्हणून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना आदी योजनांतर्गत असलेल्या निराधार लाभार्थींसाठी प्रत्येकी एक हजार रुपये देण्याची घोषणाही केली. मात्र, जिल्ह्यातील पात्र लाभार्थींना अद्याप ही मदत मिळालेली नाही. ही मदत केव्हा मिळणार, याकडे त्यांचे लक्ष लागून आहे.
0०००००००००००००
संजय गांधी निराधार योजना २९,१७२
श्रावणबाळ योजना ५०,३००
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना १७,६८९
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना ४१९
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना २८
००००००००००००००००००००००
लॉकडाऊनमुळे कामधंदा नाही
जिल्ह्यात मिनी लॉकडाऊनसारखी परिस्थिती नसल्याने कामधंदे नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव केव्हा कमी होईल, याचाही नेमका अंदाज नाही. त्यामुळे विविध निराधार योजनेतील लाभार्थींना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा लागून आहे.
संचारबंदीला १५ मेपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे. त्यानंतर पुढे काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागून आहे.
००००००००००००००००००००
एक हजार रुपये देण्याची घोषणा करून शासनाने निराधारांना आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजून मदत मिळाली नसल्याने ही केवळ घोषणाच तर ठरणार नाही ना, अशीही शंका येत आहे. मदत लवकर मिळावी.
- आशाबाई पवार
०००००
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने निर्बंध कडक केले आहेत. कामधंदे नसल्याने निराधारांची परवड होत आहे. शासनाचे एक हजार रुपयेदेखील अद्याप बँक खात्यात जमा झाले नाहीत.
- आशा श्रीवास्तव
0०००
कोरोना विषाणू संसगार्मुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत शासनाने एक हजार रुपये देण्याची घोषणा केली खरी; परंतु २२ दिवसानंतरही शासनाची मदत मिळालेली नाही.
- गयाबाई शिंदे
००००
शासनाने एक हजार रुपये देण्याची घोषणा करून थोडाफार दिलासा होता. मात्र, अद्याप एक हजार रुपये मिळाले नाहीत. त्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही मदत लवकर मिळावी.
- कुंडलिक काळे
00०
कोरोनामुळे सर्वांचेच जगणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रोजगारही नाही आणि त्यातच शासनाची आर्थिक मदतही मिळाली नाही. त्यामुळे घरची चूल कशी पेटवावी?
- सुभद्राबाई वाघ
00००
या संदर्भात जिल्हा प्रशासनाला वरिष्ठ स्तरावरून काही सूचना आलेल्या नाहीत. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम.