प्राप्त माहितीनुसार, रिसोड येथील एका शिक्षण संस्थेत शिक्षक असलेल्या शेलगाव बोंदाडे येथील नीलेश वाझुळकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचा विवाह २०१५ मध्ये केनवड येथील विश्वंभर ज्ञानबा खराटे यांच्या दीपाली नामक मुलीशी झाला. लग्नानंतर काही दिवसांनी पत्नीने खेड्यात करमत नाही व सासू-सासऱ्याचा सांभाळ करणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे २०१६ मध्ये पत्नी दीपालीस केनवड येथे माहेरी नेऊन घातले. हे प्रकरण पुढे न्यायालयात गेले. मध्यंतरीच्या काळात रिसोड येथे जाऊन सासरच्या मंडळींनी मारहाण केली, असे नीलेश वाझुळकर यांनी तक्रारीत म्हटले. अशातच शुक्रवार, २ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता सासरवाडीहून चारचाकी व काही दुचाकी वाहनांसह पत्नी दीपाली, सासरा विश्वंभर खराटे, साळा ऋषिकेश खराटे, आजस सासरा ज्ञानबा खराटे, चुलत सासरा गजानन खराटे, सु.भा. इंगळे व इतर तीन जण शेलगाव बोंदाडे येथे आले. घरासमोर येऊन आपणास ऋषिकेश खराटे याने काठीने मारहाण केली, तर गजानन खराटे हा कुऱ्हाड घेऊन अंगावर आला. आई-वडिलांनादेखील आरोपींनी मारहाण केली.
वाझुळकर यांच्या अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दीपाली वाझुळकर, विश्वंभर खराटे, ऋषिकेश खराटे, गजानन खराटे, ज्ञानबा खराटे, सु.भा.इंगळे व इतर तीन अशा एकूण नऊ जणांवर भादंविचे कलम ३२३, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास विनोद चव्हाण करीत आहेत. दुसऱ्या गटाकडून दीपाली वाझुळकर हिने आपण पती व सासरच्या मंडळीविरुद्ध ४९८ ची केस केली असून तिचा निपटारा करण्यासाठी सासरच्या मंडळींनी शेलगाव येथे बोलविले होते; मात्र सासरच्या मंडळींनी लोखंडी रॉड व काठीने मारहाण केली. नीलेश वाझुळकर यांच्या कुटुंबीयांनी व गावातील काही लोकांनी आम्ही ज्या वाहनाने आलो, त्या एम.एच. ३७ जी ८१६१ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाची तोडफोड केली. त्यावरून पोलिसांनी नीलेश वाझुळकर, प्रकाश वाझुळकर यांच्यासह १३ जणांवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले.