कारंजा लाड (वाशिम): स्वामी नृसिंह सरस्वती गुरुमहाराजांचे जन्मस्थान आणि जैनांची काशी म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासिक कारंजा शहरातील चौकांचे सौंदर्यीकरण करण्याची नितांत आवश्यक आहे. कारंजा शहराची ख्याती पाहता आणि ऐतिहासिक वारसा लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने त्याची जपणूक करून शहराच्या सौंदर्यीकरणात भर टाकण्याचा प्रयत्न करायला हवा. काही वर्षांपूर्वी स्थानिक प्रशासनाकडून त्याबाबत पावलेही उचलण्यात आली; परंतु ती कामे म्हणावी तशी झाली नाही. परिणामी, शहरातील अनेक चौक भकास झाल्याचे दिसत आहे. कारंजा शहरात सर्वच धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. शहरातील प्रत्येक सार्वजनिक उत्सव मुस्लिम-हिंदू बांधव सहकार्याच्या भावनेतून साजरा करतात. त्यानुसार शहरात विविध धर्माच्या महापुरुषांची नावेही चौकांना देण्यात आली आहेत. शहर हे सर्वधर्मीयांचे तीर्थक्षेत्र असल्याने शहरात दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे शहरातील प्रत्येक चौकाचे नव्याने सौंदर्यीकरण करून त्याची योग्य देखभाल केल्यास भाविकांचे समाधान होऊन शहराचे वैभव वाढेल. शहरातील सुभाषचंद्र बोस, शिवाजी चौकाचे सौंदर्यीकरण माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाले. त्याचे जतन योग्य रितीने होत असल्याने त्या परिसरात उत्सवात नागरिकांची गर्दी राहते. माजी नगराध्यक्ष गोलेच्छा यांच्या कार्यकाळात स्थानिक तहसील कार्यालयाच्या परिसरात असणार्या वाल्मीक चौक, जयस्तंभ चौक, आंबेडकर चौकाचे काम पूर्ण झाले होते. काही दिवस चौकातील कारंजे सुरू राहिले; मात्र आता ते बंद दिसत आहेत. सत्ता परिवर्तनानंतर शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
कांरजा लाड येथील चौकांचे सौंदर्यीकरण
By admin | Published: October 29, 2014 1:23 AM