लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी गोल्ड कार्ड प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. कॉमन सर्व्हिस सेंटर, ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्र अथवा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे अंगीकृत रुग्णालयात नोंदणी करून हे गोल्डन कार्ड प्राप्त घेता येईल. सर्व पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपले गोल्डन कार्ड प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी बुधवारी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या ई-कार्ड वाटप विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे समन्वयक डॉ. स्वप्नील सरनाईक, कॉमन सर्व्हिस सेंटरचे जिल्हा समन्वयक भगवंत कुलकर्णी, देशमुख यांची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी मोडक म्हणाले, राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत योजनेच्या गोल्डन कार्डधारकांना सुद्धा आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यातील १ लक्ष ३५ हजार ५५३ कुटुंबातील ४ लक्ष ५९ हजार ६४१ व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची यादी कॉमन सर्व्हिस सेंटर, ग्रामपंचायतीमध्ये नियुक्त डाटा एन्ट्री आॅपरेटर व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे. या यादीमध्ये नाव असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी गोल्डन कार्ड तयार करण्यासाठी शिधापत्रिका, माननीय प्रधानमंत्री प्रधानमंत्री यांचे स्वाक्षरीचे वितरीत करण्यात आलेले पत्र आणि आधारकार्ड सोबत आणावे. एखाद्या कुटुंबास माननीय प्रधानमंत्री यांचे स्वाक्षरीचे पत्र वितरीत झाले नसेल व त्यांचे नाव लाभार्थी यादीत असेल तर त्यांनी शिधापत्रिका व आधारकार्ड सोबत आणावे, अशा सूचनाही मोडक यांनी दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी मीना म्हणाले, आशा वर्कर्सच्या माध्यमातून प्रत्येक लाभाथ्यार्ला गोल्डन कार्ड बनविण्याबाबत माहिती देण्यात येत आहे. त्यानुसार कॉमन सर्व्हिस सेंटर व आपले सरकार सेवा केंद्रामध्ये येणाºया लाभार्थ्यांचे कार्ड त्वरित बनवून दिले जावे, असे सांगितले.
‘आयुष्मान भारत’च्या लाभार्थ्यांनी गोल्डन कार्ड प्राप्त करून घ्यावे - जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 4:41 PM