वाशिम : केंद्र पुरस्कृत योजनांमधील इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनाचे जून महिन्याचे अनुदान एनएसएपी (नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम-राष्ट्रीय सामाजिक सहायक कार्यक्रम) पोर्टलमधून पीएफएमएस (पब्लिक फंड मॅनेजमेंट सिस्टीम) प्रणालीद्वारे करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.
त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करावे, असे आवाहन वाशिमचे तहसीलदार बळवंत अरखराव यांनी केले.शासनातर्फे पात्र लाभार्थींना निवृत्ती वेतन दिले जाते. बोगस लाभार्थींना आळा बसविणे आणि योग्य लाभार्थींपर्यंत निवृत्ती वेतन पोहोचविणे या दृष्टिकोनातून लाभार्थींच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यात आला आहे. अद्याप काही लाभार्थींचे बँक खाते आधार क्रमांकाशी ‘लिंक’ झालेले नाही. ज्या लाभार्थ्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करण्यात आलेले नाही, अशा लाभार्थ्यांनी त्यांच्या आधारकार्डची झेरॉक्सवर ‘माझा आधार क्रमांक हा माझ्या बँक खात्याशी लिंक करण्यात यावा’ असे लिहून व त्यावर लाभार्थ्यांनी स्वाक्षरी करावी आणि सदर झेरॉक्स प्रत ज्या बँकेत खाते आहे, त्या बँकेत जमा करावी, असे आवाहन तहसिलदार अरखराव यांनी केले. तसेच ज्या लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र बँकमध्ये जमा केलेले नाही, अशा लाभार्थ्यांनी स्वत: बँकमध्ये जाऊन आपले हयात प्रमाणपत्र द्यावे, अन्यथा पुढील महिन्याचे अनुदान मिळणार नाही, अशी सूचना तहसिल कार्यालयाने दिली.