वाशिम : रिसोड तालुक्यातील पळसखेड प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील काही झाडे, विहिरी व घरांचा मोबदला संबंधित लाभार्थींना अद्याप मिळाला नाही. याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाटबंधारे विभागाला सूचना दिल्यानंतर मोबदला लवकर मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.पळसखेड परिसरात सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता पाच, सहा वर्षांपूर्वी प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात काही झाडे, विहिरी व घरे गेली असून, आतापर्यंत संबंधित लाभार्थींना मोबदला मिळणे अपेक्षीत होते. परंतू, यापासून काही लाभार्थी अद्याप वंचित आहेत. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे ५ व ६ फेब्रुवारी रोजी वाशिम जिल्हा दौºयावर असताना, मोबदला मिळाला नसल्याची आपबिती काही लाभार्थींनी जलसंपदा मंत्र्यांसमोर कथन केली. याप्रकरणी जलसंपदा व पाटबंधारे विभागाने तातडीने पावले उचलून संबंधित लाभार्थींना लवकरात लवकर मोबदला मिळण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही करावी, अशा सूचना ना. पाटील यांनी दिल्या. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जात असल्याचे सांगण्यात येते. पळसखेड प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील काही झाडे, विहिरी व घरांचा मोबदला लवकरच मिळेल, या आशेवर लाभार्थी आहेत.
पळसखेड प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील लाभार्थींना मोबदल्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:13 PM