रिसोड - तालुक्यातील पळसखेड येथील रमाई आवास योजना व प्रवर्ग ड करिता लाभार्थी निवड यादीत घोळ झाला असून, याप्रकरणी फेरसर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी पळसखेड येथील काशिमरा मोरे, एस.सी. मोरे, बाबुराव मोरे, ताजणे आदींनी गटविकास अधिकाऱ्यांकडे शुक्रवा री केली.
दारिद्र्यरेषेखालील अनेक कुटुंबाना राहण्यासाठी निवारा नाही. अशा बेघर कुटुंबांचे घरांचे स्वप्न साकारण्यासाठी राज्य शासनाने इंदिरा आवास योजना अंमलात आणली आहे. दारिद्ररेषा यादीतील गुणांकानुसार व घराची स्थिती पाहून लाभार्थी निवडीची प्रक्रिया राबविली जाते. राहायला घर नाही, बांधायला पैसा नाही, अशा बेघर व अत्यल्प उत्पन्न असलेल्या लाभार्थीला या योजनेत प्राधान्यक्रम दिला जातो. त्या अनुषंगाने पळसखेडा येथे नियमानुसार लाभार्थींना लाभ देणे अपेक्षीत होते. मात्र, संबंधित यंत्रणेने सर्वे करताना चुका केल्याने अनेक पात्र लाभार्थींना घरकुलापासून वंचित राहण्याची वेळ आली. कच्चे घर असताना पक्के दाखविण्यात आले व काही लाभार्थींची सिमेंट काँक्रिटची पक्कि घरे ही कच्ची दाखविण्यात आली, असे तक्रारीत नमूद आहे. यापूर्वी घरकुला चा लाभ घेतलेला काही लाभार्थींची नावे पुन्हा या यादीत लाभार्थी म्हणून आल्याने कुठेतरी पाणी मुरत असल्याचे दिसून येते. याप्रकरणी फेर सर्वे करण्यात यावा, पात्र लाभार्थींचा समावेश करावा, चुकीच्या सर्वे करणाºयांविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली.