एखाद्या कुटुंबातील कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्याने कुटुंब निराधार झाले असेल, तर ‘राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजने’द्वारे या कुटुंबांना सरकारकडून निधी मिळतो. संबंधित कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अत्यल्प (१५००० किंवा त्यापेक्षा कमी) असेल तरच या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेसाठी तहसीलदार कार्यालयात अर्ज करता येतो. अर्जासोबत कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, कुटुंबप्रमुखाचा मृत्यू नैसर्गिक वा अपघाती झाला असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, तसेच जन्म-मृत्यू नोंदणीचा दाखला, मृत व्यक्ती कुटुंबप्रमुख होती, त्यासंदर्भातील तलाठ्यांकडून मिळणारा दाखला, त्याशिवाय रहिवासी प्रमाणपत्र, ओळखपत्र, वारसा प्रमाणपत्र, कुटुंब दारिद्र्यरेषेखालील असल्याचा दाखला आदी जोडणे आवश्यक आहे. वाशिम जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत या योजनेंतर्गत ३ कोटी १२ लाख २० हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. तथापि, बनावट कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ घेण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस येत असल्याने जिल्हा प्रशासनाने या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले असून, रिसोड व मंगरुळपीर तहसीलअंतर्गत ही चौकशी सुरू आहे.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
पाच वर्षांत १५५१ कुटुंबांना लाभ
जिल्ह्यात राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत गेल्या पाच वर्षांत घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यानंतर आर्थिक मदतीसाठी अर्ज करणाऱ्या एकूण १५५१ कुटुंबांना २० हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. आता यातील काही कुटुंबांनी बनावट किंवा चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ घेतला आहे काय, त्याची चौकशी प्रशासनाकडून केली जात आहे.
----------
तीन तालुक्यांत अनुदानापेक्षा अधिक खर्च
राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील सहाही तालुके मिळून एकूण ३ कोटी २४ लाख ८५ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी ३ कोटी १२ लाख २० हजार रुपयांचे अनुदान लाभार्थी कुटुंबांना वितरित करण्यात आले असून, मंगरुळपीर, मालेगाव आणि कारंजा या तीन तालुक्यांत प्रत्यक्ष प्राप्त अनुदानापेक्षा अधिक खर्च झाल्याचे दिसत आहे.
--------------------
कोट : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत जिल्ह्यात चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे काय, त्याची चौकशी दोन तालुक्यांत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या चौकशीनंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
- शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम
पाच वर्षांत योजनेंतर्गत प्राप्त रक्कम आणि खर्च
तालुका प्राप्त रक्कम खर्च
वाशिम ५३३९९६७ ४३०००००
रिसोड ४६२६००० ४४०००००
मालेगाव ५३२०००० ५९८००००
मं.पीर ६५२०००० ६६४००००
मानोरा ४८२०००० ३९६००००
कारंजा ५८६०००० ५९४००००
---------------------------------
एकूण ३२४८५९६७ ३१२२००००