वाशिम: स्त्री-पुरुष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करणे आणि मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशातून, राज्यातील १६ जिल्ह्यांत सुरू असलेल्या ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’ अभियानाला जवळपास सहा महिन्यांपासून निधीची प्रतीक्षा आहे.
विविध कारणांमुळे स्त्री-पुरुष लिंगगुणोत्तरात तफावत निर्माण होत आहे. यातूनच स्त्री भ्रूण हत्या, लिंग निवड चाचणी आदी प्रकार घडत असल्याने यावर प्रभावी उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियान २१ फेब्रुवारी २0१५ पासून देशातील १00 जिल्ह्यांत सुरू असून, यासाठी १00 टक्के निधीची हमी केंद्र शासनाने घेतली आहे. या अभियानात महाराष्ट्रातील बुलडाणा, वाशिम, बीड, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली, जालना यासह १६ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. या अभियानात समाविष्ठ असलेल्या जिल्ह्यात लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत खात्री देणे, मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षिततेबाबत खात्री देणे, स्त्री-पुरुष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करणे यासह अन्य उद्दिष्ट साध्य करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवण्यात आले. यासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी पुरविला जातो. २०१७-१८ या सत्राला सुरूवात होऊन सात महिने होत आहेत. अद्याप निधी मिळाला नसल्याने या अभियानांतर्गत ऊधारीवर विविध उपक्रम राबविण्याची वेळ महिला व बालकल्याण विभागावर आली आहे. अभियानांतर्गतचा निधी लवकरच मिळेल, अशी अपेक्षा महिला व बालकल्याण विभाग बाळगून आहे.