वाशिम : पोस्ट कोविडनंतर राज्यातील विविध भागांत बुरशीजन्य आजार (म्युकॉरमायकोसिस) काही जणांमध्ये आढळून येत असल्याने पोस्ट कोविडनंतर दातांशी संबंधित कोणताही आजार उद्भवल्यास तातडीने दंतरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
कोविड आजारातून बरे होऊन घरी गेल्यानंतर काही रुग्णांमध्ये म्युकॉरमायकोसिस हा आजार आढळून येत आहे. हा आजार बुरशी (फंगल इन्फेक्शन) या जंतूंमुळे होतो. लवकर निदान झाले तर या आजारावर सहज मात करता येते. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्यांनी दातांसंबंधी कोणतीही समस्या उद्भवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरत आहे. ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती काही कारणाने कमी झालेली असेल, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले असेल तर त्यांच्यामध्ये बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विषाणू संसर्गाच्या पहिल्या दिवसापासून पुढचे कमीत कमी तीन महिने हा धोका राहू शकतो. त्यामुळे दातांसंबंधी जसे की दात व गाल दुखणे व सुजणे, हिरडीवर सूज येणे, पस निघणे, वरच्या जबड्यात दुखणे, दात शिवशिवणे, अचानक दात हलायला लागणे, तोंडात जखमा होणे आदी लक्षणे दिसून येताच दंतरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरणार आहे. पोस्ट कोविडनंतर कोणताही दंत आजार उद्भवला तर आजार न लपविता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
००००००००
पोस्ट कोविडनंतर दातांसंबंधी काही आजार उद्भवल्यास संबंधित रुग्णांनी तातडीने दंतरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. दात व गाल दुखणे व सुजणे, हिरडीवर सूज येणे, अचानक दात दुखणे व हलायला लागणे आदी लक्षणे दिसून येताच खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावे.
- डॉ. मंजूषा वराडे
दंतरोग तज्ज्ञ,
जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम