वाशिम : अनेक ठिकाणी डमी वेबसाइटद्वारे बेराेजगारांची फसवणूक झाल्याचे आपण ऐकताे. त्यामुळे बेराेजगारांनी सावध राहण्याचे आवाहन सायबर सेलकडून वेळाेवेळी केले जातेय. जिल्ह्यात गत तीन वर्षांत प्रभावी जनजागृतीमुळे डमी वेबसाइटद्वारे एकाही व्यक्तीची फसवणूक झाल्याची घटना घडली नसल्याची माहिती सायबर सेलकडून देण्यात आली.
तंत्रज्ञानाच्या युगात जग झपाट्याने बदलत आहे. जगातील कानाकोपऱ्यात असलेल्या व्यक्तीला आपण सहज बघू शकतो, त्याच्याशी संवाद साधू शकतो. मोबाइलच्या रूपाने अगदी तळहातावर सामावलेले जग आता वेगळेच वळण घेत आहे. तेवढेच ते घातकही ठरत आहे. सावधानता बाळगल्यास यामधूनही फसवणुकीपासून वाचू शकतो, त्याकरिता खबरदारी घेणे आवश्यक आहे.
------------
नोकरीच्या नावाखाली फसवणूक वाढली
जिल्ह्यातील किती बेराेजगारांची तीन वर्षांत फसवणूक झाली ही माहिती सायबरकडून घेतली असता निरंक आहे.
-----
अशी करा खातरजमा
सहज नाेकरी मिळवा, कर्ज मिळवा अशा वेबसाइटवर जाण्यापूर्वी सर्व शहानिशा करून कागदपत्रे द्यावी. पैशाची मागणी झाल्यास फसवणूक नक्की असल्याचे समजावे.
बनावट वेबसाइटवरून आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड आदीचा तपशील गाेळा करून फसवणूक केली जाऊ शकते, त्याकरिता संबंधित विभागाशी संपर्क साधून शहानिशा करणे आवश्यक आहे.
तुम्ही जेव्हा सार्वजनिक ठिकाणी असाल तेव्हा सोशल नेटवर्क साइट, ई-मेल तसेच बँकेचे अकाउंट कधीही ओपन करू नका. तसेच वेबसाइटवरही काेणतीच माहिती टाकताना ज्याने फसवणूक हाेऊ शकते ती देऊ नका.
------
अशी होऊ शकते फसवणूक
नाेकरीच्या संधीचे आमिष दाखवून वेबसाइट बनविण्यात येऊन महिन्याकाठी लाख रुपये कमविण्याची संधी असे प्रलाेभन देऊन फसवणूक हाेऊ शकते.
सहज नाेकरी मिळवा, कर्ज मिळवा अशा वेबसाइटवर आधी कागदपत्रे मागून नंतर आपल्यास संदेश पाठविला जाताे. आपण नियुक्त झालात, असे सांगून पुढे फसवणूक हाेते.
------
वाशिम जिल्हा आधीच मागासलेला आहे. त्यातही जिल्ह्यातील सुशिक्षित बेराेजगारांसह युवकही ऑनलाइन व्यवहार करताना खबरदारी घेत असल्याचे सायबर गुन्ह्याच्या तक्रारींवरून दिसून येते. मेट्राे सिटीमध्ये माेठ्या प्रमाणात सुशिक्षित बेराेजगारांची विविध वेबसाइटद्वारे फसवणुकीच्या घटना आहेत, परंतु जिल्ह्यात यासंदर्भातील गुन्ह्याची नाेंद नाही.
- राजकुमार वाढवे, सायबर सेलप्रमुख, वाशिम