लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : थोर महापुरूषांना कुठल्याही ठराविक चौकटीत अडकवून न ठेवता अठरापगड जातीतील लोकांनी सोबत येवून त्यांच्या कार्याचा जागर करायला हवा. भगवानबाबा हे देखील थोर महापुरूष होते. त्यामुळे त्यांच्या व भगवानगडाच्या विषयात कुठलेही राजकारण व्हायला नको, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी १ सप्टेंबर रोजी येथे पार पडलेल्या संत भगवानबाबा सार्वजनिक जयंती उत्सव सोहळ्यात केले.जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे होते. आमदार अमित झनक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीपराव जाधव, डॉ. जयश्री केंद्रे, चंद्रकांत ठाकरे, शिव व्याख्याते अशोक बांगर, विश्वनाथ सानप, श्याम बढे, वामनराव सानप, तहसीलदार राजेश वजीरे, बाजार समितीचे सभापती डॉ. प्रमोद नवघरे, उल्हासराव घुगे, बबनराव मिटकरी आदिंची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते संत भगवानबाबा, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ना. धनंजय मुंडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.पुढे बोलताना ना. मुंडे म्हणाले, की भगवानबाबांनी अध्यात्म व शिक्षणाची जोड देवून समाजसुधारणा करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांनी आयुष्यभर विठ्ठलाची वारी चुकू दिली नाह. वारकरी सांप्रदायाची मोठी चळवळ उभी करून गोहत्येसारख्या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला, असे त्यांनी सांगितले. विद्यमान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले, की आज याठिकाणी बॅनरवर आमच्या ताईचा फोटो असूनही मी आलो; परंतु पुढच्या जयंतीला बॅनरवर माझा फोटो टाका आणि तार्इंना बोलावून दाखवा. त्या येणार नाहीत, असा दावा त्यांनी यावेळी केला. तालुक्यातील डव्हा संस्थान हे पर्यटनस्थळ मंजूर झाले आहे. मात्र, अद्याप निधी आला नाही. त्यासाठी कागदपत्रांची पुर्तता करा; विधानसभेत आवाज उठवून विकासकामांसाठी निधी मिळवून देण्याची जबाबदारी आपली असल्याचा शब्द त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. कार्यक्रमाचे संचालन मंगेश घुगे महाराज यांनी केले; तर आभार प्रदर्शन गणेश उंडाळ यांनी केले. कार्यक्रमास तालुक्यातील पाच हजारांपेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने समाज कल्याण सभापती पानूबाई जाधव, उपसभापती गणपत गालट, सुनिता मिटकरी, भगवान शिंदे, नगराध्य्क्ष रेखा अरुण बळी, अमोल लादे, डॉ. नारायण शेंडगे, नितीन जाधव, सोनू शेळके, किसनराव घुगे आदिंचा समावेश होता.
भगवानबाबा व भगवानगड यात राजकारण नको!- धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 6:46 PM
भगवानगडाच्या विषयात कुठलेही राजकारण व्हायला नको, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी १ सप्टेंबर रोजी येथे पार पडलेल्या संत भगवानबाबा सार्वजनिक जयंती उत्सव सोहळ्यात केले.
ठळक मुद्देसर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते संत भगवानबाबा, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते ना. धनंजय मुंडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.