शेलू बाजार : येथून जवळच असलेल्या चिखली येथील संत झोलेबाबा यांच्या यात्रोत्सवाला कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी असल्याने दरवर्षी पौष पौर्णिमेला होणारा श्रीक्षेत्र चिखली येथील संत झोलेबाबा यांचा यात्रोत्सव यावर्षी साध्या पद्धतीने होणार असून, या यात्रोत्सवानिमित्त शुक्रवारपासून भागवत सप्ताहाला प्रारंभ होणार आहे.
दरवर्षी पौष पौर्णिमेला चिखली येथे संत झोलेबाबा यांचा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते; परंतु यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असून, शासनाने याविषयी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार झोलेबाबा यांचा यात्रा महोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार असल्याची माहिती संस्थानच्या विश्वस्त मंडळाने दिली आहे. या यात्रोत्सवाचा मुख्य दिवस २८ जानेवारी असून, यात्रोत्सवानिमित्त २१ जानेवारीपासून झोलेबाबांच्या बंगईच्या ठिकाणी ह.भ.प. विठ्ठलदास महाराज यांच्या वाणीतून भागवत वाचन केले जाणार आहे.