भारत जोडो अभियान पदयात्रा अकोलाकडे रवाना
By नंदकिशोर नारे | Published: November 16, 2022 07:19 PM2022-11-16T19:19:05+5:302022-11-16T19:19:34+5:30
भारत जोडो अभियान पदयात्रा अकोलाकडे रवाना झाली आहे.
वाशिम: वाशिम जिल्ह्यात १५ नोव्हेंबर रोजी खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात दाखल झालेली भारत जोडो पदयात्रा १६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी मेडशी येथील कॉर्नर सभा आटोपून अकोलाकडे रवाना झाली. जिल्हयात १५ नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या पदयात्रेत पहिल्यादिवशी हजारो नागरिक सहभागी होऊन गांधी यांचे जागोजागी स्वागत करण्यात आले होते. वाशिम येथे मुक्कामास थांबून १५ नोव्हेंबर रोजी पदयात्रा थांबली होती.
१६ नोव्हेंबर रोजी पहाटे ६ वाजता वाशिमनजिक जांभरुण येथून सुरुवात झाली. ही पदयात्रा धारकाटा, सावरगाव, झोडगा, अमानी, मालेगाव, वारंगा, रिधोरा, मेडशी मार्गे जाऊन मेडशी येथील कॉर्नर सभेनंतर ही यात्रा अकोला जिल्हयाकडे रवाना झाली. या दरम्यान जांभरुण फाटयावर गांधी यांचे जंगी स्वागत करुन पदयात्रा पुढे निघाली असता सावरगाव येथे कॉलेजच्या विद्यार्थ्यांची त्यांनी भेट घेतली. अमानी येथे बिबे फोडणाऱ्या महिलांची व्यथा, मालेगाव येथे धुरकरी बनलेल्या महिलांशी हितगुज साधून मार्गात अनेकांची भेट घेतली. मालेगाव येथे विश्रांतीनंतर दुपारी ते मेडशीकडे मार्गस्थ झाले आहेत. संध्याकाळी ६.३५ वाजता कॉर्नर सभा घेऊन ७ वाजता संपल्यानंतर ताबडतोब अकोलाकडे रवाना झालेत.