- संतोष वानखडेवाशिम : राहुल गांधी यांनी यात्रा मार्गावरच्या अमानी गावातील बिबे फोडणाऱ्या महिलांच्या व्यथा जाणून घेतल्या. बुधवारी वाशिमहून अकाेल्याच्या दिशेने पदयात्रा निघाली. वाशिम-मालेगाव महामार्गावरील अमानी गावाची लोकसंख्या जवळपास ४ हजारांच्या आसपास असून, अनेक वर्षांपूर्वी गावाच्या परिसरात असलेल्या जंगलातून ग्रामस्थ बिबे गोळा करून त्यामधून गोडंबी काढण्याचे काम करीत आहेत. महिला हाताने गोडंबी फोडतात. यामुळे त्यांना त्वचारोगही होतात. बिबे फोडून गोडंबी काढताना नेमक्या काय समस्या जाणवतात, याची माहिती राहुल यांनी घेतली.
हिमाचलचा दिव्यांग सूरज पदयात्रेत सामील वाशिम : भारत जोडो पदयात्रेत हिमाचल प्रदेशातील सूरज कुमार शर्मा हा दोन्ही हात नसलेला तरुण तेलंगणा येथून सहभागी झाला असून, तो यात्रेसोबत काश्मीरपर्यंत जाणार आहे. पूर्ण उत्साहाने तो पदयात्रेत चालत आहे. सूरजने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले असून, दोन्ही हात नसतानाही त्याची शिक्षणात उंच भरारी घेण्याची इच्छा आहे.