लोकमत न्यूज नेटवर्करिसोड - रिसोड पंचायत समितीचे नियमित गटविकास अधिकारी म्हणून शिवशंकर भारसाकळे यांनी शुक्रवारी सूत्रे स्विकारली. गत दीड वर्षापासून सदर पद रिक्त होते. जानेवारी २०१६ पासून रिसोड पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून दिगांबर मकासरे, व्ही. पुजारी, शृंगारे यांनी कामकाज पाहिले. आता नियमित गटविकास अधिकारी म्हणून भारसाकळे रूजू झाले आहेत. भारसाकळे यांनी यापूर्वी मंत्रालयात गृह विभागात कक्ष सहाय्यक, पोलीस उपनिरीक्षक म्हणूनही सेवा दिलेली आहे. तसेच गडचिरोली पंचायत समिती येथे पाच वर्षे गटविकास अधिकारी म्हणून सेवा दिलेली आहे. सर्वसामान्य जनतेच्या कामाला प्राधान्य देऊन विकासात्मक कामांना चालना देण्याचा प्रयत्न राहिल, असे मत भारसाकळे यांनी व्यक्त केले.