वाशिम : राज्याचे माजी कृषी मंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे कार्य सदैव स्मरणात राहावे, यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने अमलात आलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची कृषी विभागाकडून अंमलबजावणी सुरू आहे; मात्र महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी केवळ १०० कोटी रुपये अनुदानाची तरतूद असून, तालुकानिहाय २४ ते २५ लाख रुपयेच मिळत आहेत. त्यातून केवळ ५० शेतकºयांची निवड शक्य असून, त्यांनाही तुटपुंजे अनुदान मिळणार असल्याने शेतकºयांमधून याप्रती नाराजीचा सूर उमटत आहे.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत आंबा, डाळिंब, काजु, पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, जांभुळ, कोकम, फणस, कागदी लिंबु, चिकु, संत्रा, मोसंबी, अंजीर व नारळ आदी स्वरूपातील फळबाग लागवडीचा समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकरी स्वावलंबी व्हावे, हा उद्देश बाळगण्यात आला असला, तरी त्यासाठी भरीव अनुदानाची तरतूद अपेक्षित असताना शासनाने महाराष्ट्रातील छोट्या जिल्ह्यांना दीड ते दोन कोटी रुपयेच अनुदान मंजूर केले आहे. त्यातून पात्र लाभार्थींची निवड करून त्यांना अनुदान वितरित करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.प्रत्यक्षात मात्र तालुक्यांच्या वाट्याला २४ ते २५ लाख रुपयेच अनुदान येत असल्याने त्यातून साधारणत: ५० शेतकºयांची निवड करून त्यांना अनुदान वितरित करायचे झाल्यास प्रति शेतकरी केवळ ५० हजार रुपये अनुदान देणे शक्य आहे. एवढ्या कमी रकमेतून किती हेक्टरवर फळबाग लागवड करायची, असा प्रश्न शेतकºयांमधून उपस्थित केला जात आहे. याशिवाय अर्ज अधिक प्रमाणात प्राप्त होत असताना तुटपुंज्या अनुदानामुळे लाभार्थी निवडीवर मर्यादा येत असल्याने कृषी विभागाचीही डोकेदुखी वाढली आहे.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यातील सहा तालुक्यांच्या वाट्याला प्रत्येकी २४ ते २५ लाख रुपये अनुदान आलेले आहे. त्यानुसार, देय अनुदानाच्या मर्यादेत शेतकºयांची ‘लकी ड्रॉ’द्वारे निवड केली जात आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकºयांना ५० ते ६० हजार अनुदान देणे शक्य आहे.- दत्तात्रय गावसानेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम.