लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाने २०१८-१९ पासून राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नव्याने राबविण्यास मान्यता दिली असून, या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांना लाभ देण्यात येत आहे. सदर योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिल्यानंतर पूर्व संमती देण्यात आलेल्या शेतकऱ्यांकडून रोप लागवडीसाठी लगबग सुरू आहे.राज्यात राबविण्यात येत असलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत भाग घेऊन झाडे लागवडीचा कालावधी मे ते नोव्हेंबर ठेवण्यात आला होता; परंतु यावर्षी दुष्काळसदृष स्थिती असल्याने, तसेच योजनेच्या अंमलबजावणीस विलंब झाल्याने विहीत कालावधित फळबाग लागवड करणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे सदर योजनेंतर्गत फळबाग लागवडीच्या कालावधीसस मुदतवाढ देण्याची कृषी आयुक्तालयाकडून करण्यात आली होती. यानुसार शासनाने या योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढीनंतर कृषी विभागाकडे अर्ज सादर करून पूर्व संमती देण्यात आलेल्या शेतकºयांकडून फळझाडांच्या लागवडीसाठी लगबग सुरू झाली आहे. यासाठी कृषी विभागाच्या रोपवाटिकेतून मोठ्या प्रमाणात रोपांची खरेदी करण्यात येत असल्याने या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या योजनेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदानापैकी पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० टक्के आणि तिसऱ्या वर्षी २० टक्के, असे तीन टप्प्यांत देण्यात येणार आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडीला मुदतवाढ देण्यात आली असून, निर्धारित निकषानुसार लॉटरी पद्धतीने निवड करून पूर्वसंमती दिलेल्या शेतकºयांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.-दत्तात्रय गावसाने,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम