वाशिम: महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हय़ातील समाजबांधव व आंबेडकरी अनुयायांनी रविवारी महामानवाला साश्रूनयनांनी आदरांजली वाहिली. वाशिम शहरवासीयांनी पहाटे ५.३0 वाजतापासून कॅन्डल मार्च काढून स्थानिक आंबेडकर चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर भिक्खू संघांच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेबांना अभिवादन केले.पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून उपासक-उपासिका कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाल्या. पहाटे ५.३0 वाजताच्या सुमारास कॅन्डल रॅली काढण्यात आली. शहरातील नालंदानगर, आनंदवाडी, पंचशीलनगर, श्रावस्ती नगर, अल्लाडा प्लॉट, सिव्हिल लाइन, भीमनगर, नवीन आययूडीपी, रमाबाईनगर, लाखाळा यासह विविध भागातून बाबासाहेबांचे अनुयायी हातात कॅन्डल घेऊन शांततेचा संदेश देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले. प्रत्येकाने डॉ. बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सकाळी ९.३0 वाजतादरम्यान आंबेडकर मैदानातील पंचशील धम्मध्वजाचे धम्मध्वजारोहण व भिक्खू संघांच्या उपस्थितीमध्ये त्रिशरण पंचशील, सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल अँक्टिवा फोरम, संघमित्रा धम्मसेवा महिला मंडळ, मंगलमैत्री महिला मंडळ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, जम्बुदीप संघ, पंचशील संघ, तथा समस्त बौद्ध उपासक व उपासिका यांच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला. रिसोड, मालेगाव येथेही कॅन्डल मार्च काढून महामानवाला अभिवादन करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध सामाजिक संघटना, आंबेडकरी चळवळ, विविध पक्षांचे पदाधिकारी आदींनी भावपूर्ण आदरांजली वाहली.
भीमराया, घे तुझ्या लेकरांची वंदना !
By admin | Published: December 07, 2015 2:25 AM