लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झालेली असतानाही, बहुतांश चालकांचा ‘विनाहेल्मेट’च प्रवास सुरू असल्याचे दिसून येते. रस्ता अपघात कमी करणे, दुचाकी अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार दुचाकी वाहन चालकांसाठी ‘हेल्मेट’ सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने जानेवारी महिन्यापासून सुरू केली आहे. सुरूवातीला कारवाईची धडक मोहिम राबविली. त्यानंतर मार्च एन्डिंगला महसूल वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी या मोहिमेत थोडी शिथिलता येताच, चालकांनी हेल्मेट वापराकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता हेल्मेट वापरामुळे अपघातप्रसंगी चालकांनाच सुरक्षितता मिळेल, यात शंका नाही. जिल्ह्यात अडीच लाखापेक्षा अधिक दुचाकी वाहने असून, वाहन चालविताना अपघात झाल्यास डोक्याला गंभीर दुखापत किंवा मृत्यू ओढवू नये म्हणून हेल्मेटचा वापर कसा आवश्यक आहे, यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने रस्ता सुरक्षा पंधरवड्यादरम्यान मार्गदर्शनही केले आहे. हेल्मेटचा वापर केल्यास सुरक्षीत प्रवास कसा होऊ शकतो, हेदेखील पटवून देण्यात आले आहे. तथापि, अनेक चालकांनी हेल्मेट वापराकडे दुर्लक्ष चालविल्याचे दिसून येत आहे. वाहनधारकांनी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने केले आहे.
वाशिम जिल्ह्यात ‘हेल्मेट’ वापरला चालकांचा कोलदांडा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 3:14 PM