वाशिम: राज्यात काही ठिकाणी ‘बर्ड फ्ल्यू’चे संक्रमण झाल्याचे आढळून आले आहे. वाशिम जिल्ह्यात अद्याप अशाप्रकारची कोणतीही घटना आढळून आलेली नसून, ‘बर्ड फ्ल्यू’बाबत समाज माध्यमातून पसरणाºया अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. या अफवांमुळे घाबरून न जाता आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखडे यांनी १३ जानेवारी रोजी केले.राज्याच्या काही भागात ‘बर्ड फ्लू’चे संक्रमण होत आहे. सुदैवाने वाशिम जिल्ह्यात अद्याप कोणताही धोका नाही. समाज माध्यमांमध्ये अफवा पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पशुपालक, नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. पोल्ट्री फार्ममधील पक्षी अथवा बदके, कावळे यासारखे पक्षी मृत्यूमुखी आढळून आल्यास नागरिकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला तातडीने माहिती द्यावी. कुक्कुटपालकांनी कुक्कुटपालन शेड व परिसरात स्वच्छता राखावी तसेच शेडचे सोडियम हायपोक्लोराईड, धुण्याचा सोडा, चुना लावून निर्जंतुकीकरण करावे. पक्ष्यांचे पिंजरे, त्यांना रोज ज्या भांड्यात खाणे दिले जाते, अशी भांडी रोज पावडरने स्वच्छत धुवावीत. एखादा पक्षी मरण पावला तर त्याला उघड्या हाताने स्पर्श करू नका. त्याबाबत नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थांना कळवा. पक्षांच्या स्त्रावासोबत तसेच विष्ठेसोबत संपर्क टाळा. आजारी दिसणाºया, सुस्त पडलेल्या पक्ष्याच्या संपर्कात येवू नका. पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने हात वारंवार स्वच्छ धुवा. व्यक्तिगत स्वच्छता, परिसर स्वच्छ ठेवा, असे आवाहन डॉ. वानखडे यांनी केले.
‘बर्ड फ्लू’ : घाबरू नका, काळजी घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 6:07 PM