कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील ६२५ पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरात पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. जनतेकडून या निर्बंधाची अमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकाऱ्यांच्या खांद्यावरही असून, त्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाहीसुद्धा केली आहे. मास्क न लावणाऱ्या हजारो लोकांकडून दंडही वसूल केला. तथापि, स्वत: तहसीलदारांनाच नियमांचा विसर पडल्याचे दिसत असून, फिजिकल डिस्टन्सिंग विसरून मानोरा येथील विद्यमान तहसीलदारांच्या वाढदिवसाचा जल्लोष करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे नियम केवळ जनतेसाठीच आहेत काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
------------
मास्क लावण्याचीही तसदी नाही
मानोरा येथील तहसील कार्यालयात तहसीलदारांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकच झुंबड केली. त्यावेळी स्वत: तहसीलदार महोदया आणि त्यांच्या बऱ्याच सहकाऱ्यांनीही मास्क लावण्याची तसदी घेतल्याचे दिसले नाही.