वाशिम : लोकसभेचा यवतमाळ-वाशिम मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात असला तरी येथे भाजपाच्या एका प्रदेश पदाधिकाऱ्याने बंडखोरी केली असून त्याला युतीतीलच नेत्यांकडून पडद्यामागून ‘बुस्ट’ दिले जात आहे. ही बंडखोरी शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरू शकते, असे राजकीय गोटात मानले जात असले तरी शिवसेना मात्र हे आमच्या फायद्याचेच होईल, असे सांगून या बंडखोराला अदखलपात्र ठरविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांनी पाचव्या टर्मसाठी नामांकन दाखल केले. २०१४ पर्यंत शिवसेना जिल्ह्यात एकसंघ होती. त्यावेळी मोदीची लाटही होती. त्याचा फायदा सेनेला झाला. परंतु यावेळी विपरित स्थिती आहे.
लाट ओसरली, सेनेत दुफळीआता मोदींची लाटही ओसरली आहे आणि शिवसेनाही एकसंघ राहिलेली नाही. शिवसेना नेत्यांमधील भांडणे ‘मातोश्री’पर्यंत पोहोचली. तेथे मनोमिलनही झाले. मात्र हे मनोमिलन केवळ देखावा असल्याचे शिवसेनेतच बोलले जाते. भाजपा-सेनेच्या तीन-चार भाऊंनी एकत्र येऊन भावना गवळींच्या उमेदवारीला विरोधही केला होता. यावरून मनोमिलन फेल ठरल्याचे स्पष्ट होते. तसेच वाशिम जिल्हयात शिवसेनेमध्ये फूट, गट नसल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यामध्ये गटबाजी दिसून येते.
बंडखोराचे रिमोट युतीच्या नेत्यांकडेभाजपा-सेनेच्या या नाराज नेत्यांकडून भाजपाच्या त्या बंडखोराला सुरुवातीपासूनच प्रोजेक्ट केले जात आहे. त्यातूनच त्यांनी अपक्ष नामांकन दाखल केले. त्यांचे रिमोट भाजपा-सेनेच्या या नेत्यांच्या हाती असल्याचेही बोलले जाते. इकडे नामांकनाची धामधूम असताना सोमवारी या बंडखोराने आपले कार्यकर्ते व निवडक समाज बांधवांची एका हॉटेलमध्ये बैठक घेतली व तेथे आपण माघार घेणार नसल्याचा निर्धार बोलून दाखविला. या बंडखोराला समाज बांधवांची मोठी साथ मिळू शकते. हा बंडखोर शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरेल, असे मानले जाते. युतीच्या नेत्यांनी एकजुटीने शिवसेनेचे काम करू असे जाहीर केले असले तरी त्यांचे हे वक्तव्ये युतीच्या कार्यकर्त्यांना तेवढे विश्वसनीय वाटत नसल्याच्या प्रतिक्रिया आहे. भाजपाच्या बंडखोराला पडद्यामागून बुस्ट देणाऱ्या नेत्यांच्या नावाची मतदारसंघात चर्चा होऊ लागली आहे.