संतोष वानखडे
वाशिम : जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समितीच्या २७ गणांसाठी ५ ऑक्टोबर २०२१ रोजी मतदान होणार आहे. अगोदरच घोटाळ्याच्या आरोप-प्रत्यारोपावरून सेना-भाजपातील वाद पेटलेला असताना, आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत सेना-भाजपा उमेदवारांमधील लढती नेमक्या कशा रंगणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
न्यायालयीन निर्णयानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी ५ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होत असल्याने राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग घेतल्याचे दिसून येते. महत्त्वाच्या गट व गणांत भाजपातर्फे निवडणूक रिंगणात उमेदवार उतरविण्यात येणार असून, शिवसेनादेखील तेवढ्याच ताकदीने प्रचारकार्यात उतरल्याचे दिसून येते. भाजपा आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी एकमेकांवर घोटाळ्यांचे आरोप केल्याने राजकीय क्षेत्र ढवळून निघत आहे. आता त्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीने आणखी भर घातली असून, ग्रामीण भागात राजकारण चांगलेच तापत आहे. गत पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषदेत भाजपा-शिवसेनेने एकमेकांच्या हातात हात देत प्रबळ विरोधकाची भूमिका पार पाडली होती. तीन वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने भाजपा-सेनेत शाब्दिक वादाची ठिणगी पडली. याचे पडसाद जिल्ह्यातही अधूनमधून उमटत असून, आता पोटनिवडणुकीत भाजपा-सेना उमेदवारांमधील लढती कशा लक्षवेधक ठरतील, याकडे दोन्ही पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह राजकीय क्षेत्राचे लक्ष लागलेले आहे.
....................
काटा, उकळीपेन, कुपटा गटाकडे लक्ष!
वाशिम तालुक्यातील काटा, उकळीपेन, मानोरा तालुक्यातील कुपटा, फुलउमरी यासह पंचायत समितीच्या काही गणात लक्षवेधक लढती होण्याचे संकेत आहेत. जेथे सेना किंवा भाजपाचा उमेदवार नसेल, तेथे त्या पक्षातील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते नेमकी कोणती भूमिका घेतात, कुणाला छुप्या पद्धतीने मदत करणार? हे पाहणे उत्कंठावर्धक ठरेल, यात शंका नाही.
.......
कुरघोडीच्या राजकारणात कुणाचा होईल गेम?
राजकारणात कधी काय होईल, याचा नेम नाही. राजकारणात कुणी कुणाचा कायम शत्रू अथवा मित्र नसतो, असेही म्हटले जाते. कुणी वरचढ ठरत असेल तर दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्याचा राजकीय गेम कसा करायचा, याचे कसब मुरब्बी राजकारण्यांमध्ये ठासून भरलेले असते. पोटनिवडणुकीत कुरघोडीच्या या राजकारणाचा अन्य पक्षांच्या उमेदवाराला फायदा झाल्यास नवल वाटायला नको, असे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे.