कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये महावितरण कंपनीने राज्यातील वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले दिली. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिलाबाबत ग्राहकांना दिलासा देण्याचे आश्वासन देऊनही महावितरणने पठाणी वसुली सुरूच ठेवली. धक्कादायक बाब म्हणजे सध्या महावितरणने राज्यभरातील ७५ लाख वीज ग्राहकांना विद्युत पुरवठा खंडित करणार असल्याच्या नोटीस बजावल्या आहेत. सरकारच्या या तुघलकी धोरणाविरोधात भारतीय जनता पार्टीने आज जिल्हाभरात आंदोलनात्मक भूमिका घेऊन महावितरणविरोधात हल्लाबोल करत स्थानिक अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकून घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हा महामंत्री नागेश घोपे यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात शहर महामंत्री गणेश खंडाळकर, अंबादास कालापाड, न. प. उपाध्यक्ष बापू ठाकूर, रामेश्वर ठेंगडे, संतोष शिंदे, रामप्रसाद सरनायक, रामभाऊ देव, पंकज इंगोले, उत्तमराव पोटफोडे, विश्वास ब्रम्हेकर, बजरंग आळणे, सुरज चौधरी, पवन बोलवार, रूपाली देशमुख, अंजली पाठक, संगीता इंगोले, छाया मडके, आशुतोष निरखी, रोहित चांदवाणी, सौरभ गंगावणे, पवन कणखर आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
महावितरणच्या वीजबिल वसुलीविरोधात भाजपचा "हल्लाबोल"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 5:18 AM