वाशिम : कंत्राटी पदभरतीद्वारे महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे महापाप महाविकास आघाडीने केल्याचा आरोप करून भारतीय जनता पार्टीने शहरातील पाटणी चाैकात २१ ऑक्टोबर रोजी ‘सत्यमेव जयते’ आंदोलन केले. यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करण्यात आले.
यासंदर्भातील निवेदनात भाजपाने नमूद केले आहे की, ‘मविआ’च्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी भरतीच्या शासन निर्णयावर स्वाक्षरी केली. आता तेच कंत्राटी पद्धत देवेंद्र फडणवीस यांनी आणल्याचे सांगत आहेत. कॉंग्रेसचे सुशील कुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि मविआचे उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी पद्धतीने भरती केली, त्याचा पुरावा समोर आला आहे. कंत्राटी भरती हे कॉंग्रेस व मविआने केलेले पाप असल्याचे निवेदनात नमूद आहे.
या विरोधात भाजपाने जिल्हाध्यक्ष शाम बढे यांच्या नेतृत्वात पाटणी चौकात आंदोलन केले. आंदोलनात पक्षाचे जिल्हा महामंत्री नागेश घोपे, गजानन लाटे, मंडल अध्यक्ष संतोष शिंदे, प्रल्हाद गोरे, गजानन नवघरे, माजी आमदार पुरूषोत्तम राजगुरू, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळू मुरकुटे, राहुल तुपसांडे, करूणाताई कल्ले यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.