कारंजा लाड (जि. वाशिम) : कारंजा तालुक्यातील मांडवा येथे काळविटाची शिकार झाल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. या प्रकरणी वन विभागाने अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आता दोन संशयित आरोपीची चौकशी कारंजा वन विभागाकडून सुरू आहे. या काळविट शिकार प्रकरणातील मुख्य आरोपी कोण हे दोघांच्या चौकशीनंतर निश्चित होईल.४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये निनावी फोन आला की, कारंजा तालुक्यातील मांडवा येथे कोण्या अज्ञात व्यक्तीने काळविटाची शिकार केली आहे, त्या माहितीच्या आधारावर कारंजा वन परीक्षेत्र विभागाचे क्षेत्रीय सहायक संजय नांदुरकर, ए.बी. इढोळे, राठोड, ए.पी. पवार, इंगळे यांनी ४ सप्टेंबर रोजी रात्री ७ वाजताच्या दरम्यान मांडवा गावात प्रवेश केला. पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीवरुन सुनील पांडुरंग पवार यांचे घर गाठले. यावेळी घराची तपासणी केली असती घरामध्ये काळविटाची शिकार झाल्याचे काहीच आढळून आले नाही; मात्र यावेळी वन कर्मचार्यांनी गावात पाहणी केली असता सुनील पवार यांच्या घराच्या उत्तरेस काळविटाचे जाळलेले अवशेष आढळून आले. त्यावेळी वनविभागाने पंचनामा करून त्या काळविटाचे अवशेष जप्त केले. त्याच वेळी रात्री ८ वाजता वनपरीक्षेत्र विभाग कारंजा येथे सुनील पवार व जीवन पवार यांना चौकशीकरिता बोलावले असता त्या चौकशीत काहीच निष्पन्न झाले नाही. शेवटी या संशयितांना समज देऊन दोघांना पुन्हा ७ सप्टेंबर रोजी बोलावण्यात आले आहे. त्यावरुन काळविट शिकार प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण १९७२ चे कलम ३९, ९,३९,४८ (अ), ४९, ५१ मधील तरतुद नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीतून बरेच काही समोर येणार आहे. ४ सप्टेंबरला सदर घटना उघडकीस आली असून, अद्याप या घटनेतील रहस्य उलगडले नाही, यावरून तर्कवितर्क लढविले जात आहेत.
काळविटाची शिकार
By admin | Published: September 07, 2015 1:41 AM