लोकमत न्यूज नेटवर्ककेकतउमरा : नियतीने अंधकारमय जीवन दिलेले असताना मनामध्ये कुठलीही निराशा न ठेवता प्रत्यक्ष स्वत:च्या हाताने राख्यांची निर्मिती करुन त्याची विक्री करण्याची अंध मुलांनी डोळस कामगिरी करुन दाखविली आहे. यामधून त्यांनी चक्क ५५ हजार रुपयांची कमाई केल्याचे चेतन सेवांकुर मध्ये राहिलेल्या अंध चेतन उचितकर यांच्यासह त्यांच्या सहकाºयांनी दिली.येथून जवळच असलेल्या केकतउमरा येथील रहिवाशी चेतन पांडुरंग उचितकर, लक्ष्मी बळीराम वाघ, प्रविण रामकृष्ण कठाळे, कैलास वसंतराव पानबुडे, संदीप केशव भगत, अमोल अर्जुन गोडघासे, तुलशीदास श्रीकांत तिवारी, रुपाली सोपान फुलसावंगी व गौरव गजानन मालक या अंधांनी डोळसांवर मात करीत स्वहस्ते राख्या निर्मितीचा उपक्रम हाती घेतला. संगित कलेच्या माध्यमाने उपजिविका चालविणाºया चेतन सेवांकुर दिव्यांग फाउंडेशनचे दृष्टीहीन अंध सदस्यांनी राख्या बनवून त्यांची विक्री करावी आपली उपजिविका चालवावी यासाठी हा उपक्रम हाती घेतला . राख्या तयार झाल्यानंतर त्यांनी वाशिम, नागपूर, औरंगाबाद येथे त्याची विक्री केली. अनेक सामाजिक संघटना, शिक्षणसंस्थांनी त्यांच्या उपक्रमाचे कौतूक करुन त्यांच्या व्यवसायाला हातभार लावीत राख्या खरेदी केल्यात. एकीकडे रोजगार नाही अथवा शेतात उत्पन्न नाही या कारणावरुन शिक्षित अशिक्षित लोक आत्महत्येचा मार्ग स्विकारत आहेत. तर दुसरीकडे जन्मताच जीवनात अंधार असताना हिम्मत न हारता जिद्द, चिकाटी, परिश्रम व जगण्याची उमेद बाळगून डोळसांना लाजविणारी कामगिरी दहा वर्षीय चिमुकला चेतन उचितकर व त्याचे अंध सहकारी मित्र करीत आहेत. चेतन व त्याचे सहकारी संगितमय आॅस्क्रेस्टा चालवून स्वत:चा उदरनिर्वाह करीत असून चेतन याने आतापर्यंत सुमारे ४५0 कार्यक्रमांद्वारे शेतकरी आत्महत्या , नेत्रदान, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूण हत्या, वृक्षारोपण, बेटी बचाव बेटी पढाओ यासारख्या सामाजिक उपक्रमावर तसेच ज्वलंत प्रश्नांवर जनजागरण करुन समाजसेवेचे व्रत जोपासले आहे.
अंध मुलांनी कमाविले ५५ हजार रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 4:17 PM