भारतीय जनता पक्षाचे सरकार महाराष्ट्रात सत्तारूढ असताना कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बळीराजाला उभारी मिळावी यासाठी सन २०१७ मध्ये शेतकऱ्यांना तब्बल दीड लाख रुपयापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना घोषित केली होती. दापुरा येथील असंख्य शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेस पात्र असूनही वंचित असल्याचे निवेदन यापूर्वी देण्यात आले आहे. तसेच विदर्भ कोकण बँक कारंजा शाखेतील दापुरा येथील खातेधारक शेतकरी वंचित असल्याचे प्रशासनाला वारंवार कळविण्यात आले. लेखी अर्ज विनंत्या करूनही प्रशासन दखल घेत नसल्यामुळे बाळू राठोड या दापुरा येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांसोबत आंदोलन करण्यात आले.
रास्ता रोको आंदोलन दरम्यान मानोरा-कारंजा या राज्य महामार्गावर असंख्य वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्याने मानोरा येथील नायब तहसीलदार संदेश किर्दक यांनी रास्ता रोको स्थळी जाऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.