रिसोड : रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ कायम असल्याचे निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने ३ डिसेंबर रोजी दिला. त्यानुसार ७ डिसेंबर रोजी बाजार समितीच्या सभापती सुमन भुतेकर यांच्याकडे पदभार देण्यात आला.रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचा पाच वर्षाचा कालावधी संपल्यामुळे साधारणत: अडीच महिन्यांपूर्वी प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधकांनी पदभार स्विकारला होता. त्यानंतर मुदत संपलेल्या राज्यातील बाजार समिती संचालक मंडळांना मुदतवाढ देण्यात आली. परंतू, रिसोड येथील संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावे, यासाठी विरोधकांनी कृषी व पणन मंत्र्यांच्या दरबारात धाव घेतली होती. वरिष्ठांच्या आदेशानुसार रिसोड बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. दुसरीकडे राज्यातील अन्य बाजार समिती संचालक मंडळाला मुदतवाढ असल्याने रिसोडलाच का नाही? या मुद्याच्या अनुषंगाने सभापती सुमन भुतेकर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली होती. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर अन्य बाजार समित्यांप्रमाणे रिसोड बाजार समितीचे संचालक मंडळ कायम राहिल, असा निर्णय नागपूर खंडपिठाने ३ डिसेंबर रोजी दिला. त्यानुसार ७ डिसेंबर रोजी सभापती भुतेकर यांच्या पदभार सोपविण्यात आला.
रिसोड बाजार समितीचे संचालक मंडळ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 11:19 AM