लोकमत न्यूज नेटवर्कवाकद(वाशिम) : येथील एका अवैध सावकार प्रकरणाचा पाच वर्षानंतर निकाल लागला असून, सावकार पीडित आश्रू किसन बोडखे यांना सावकाराच्या ताब्यात असलेली जमीन परत करण्याचे आदेश सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी पारित केल्याची माहिती २३ मार्चला प्राप्त झाली. याबाबत अधिक माहिती अशी की, वाकद येथील आश्रू बोेडखे यांची सर्व्हे नं. २९५ मध्ये ०.८५ हे.आर. जमीन आहे. तथापि, एकलासपूर येथील जगन गंगा भारती यांच्याकडून घेतलेल्या १ लाख ५६ हजार रुपये रकमेतून सदर जमिनीची खरेदी करून देण्यात आली होती. सदर रक्कम व्याजासह परत देण्यासाठी वाकद येथील सदाशिव सखाराम पोपळघट यांच्याकडून बोडखे यांनी सन २०११ मध्ये ४ टक्के व्याजदराने २ लाख १८ हजार रुपये घेतले. त्याबदल्यात सदर जमिनीची खरेदी जगन भारती यांच्याकडून वनमाला सदाशिव पोपळघट यांच्या नावे करण्यात आली. दरम्यान, पोपळघट यांचे पैसे परत करून जमीन नावावर करून देण्याची मागणी केली असता, पोपळघट यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे आश्रू बोडखे यांचा मुलगा संतोष बोडखे याने आपली जमीन परत मिळण्यासाठी विभागीय सहनिबंधक, अमरावती यांच्याकडे तक्रार दाखल केली. तसेच उच्च न्यायालय खंडपीठ, नागपूर येथेही याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने ९ सप्टेंबर २०१५ ला ही याचिका निकाली काढली व याबाबतची नोटीस जिल्हा उपनिबंधक कार्यालयास निर्गमीत करण्यात आली. त्यावरून सदर व्यवहार हा अवैध सावकारी स्वरुपाचा असल्याचे सिद्ध झाल्याने सावकारी अधिनियम कलम १८ (२) अन्वये सदर खरेदी अवैध ठरविण्यात आली व कर्जदार आश्रू किसन बोडखे यांना जमीन परत करण्याचे आदेश जिल्हा निबंधक यांनी दिले.
बोडखे यांना जमीन परत करण्याचा आदेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 1:58 AM
वाकद(वाशिम) : येथील एका अवैध सावकार प्रकरणाचा पाच वर्षानंतर निकाल लागला असून, सावकार पीडित आश्रू किसन बोडखे यांना सावकाराच्या ताब्यात असलेली जमीन परत करण्याचे आदेश सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी पारित केल्याची माहिती २३ मार्चला प्राप्त झाली.
ठळक मुद्दे वाकद येथील प्रकरण पाच वर्षांनंतर मिळाला न्याय