वाशिम : स्थानिक पंचशील नगरातील एका २२ वर्षीय युवकाची हत्या झाल्याची घटना १२ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. विशाल प्रेमानंद शेलार ऊर्फ टिल्ल्या असे मृतकाचे नाव आहे. स्थानिक पंचशील नगरात नुकतेच एका घरकुलाचे बांधकाम झाले असून, या घरकुलाच्या मागच्या बाजूला असलेल्या हौदात एका युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती वाशिम शहर पोलीस स्टेशनला १२ एप्रिल रोजी मिळाली. या माहितीवरून सहायक पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे, वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार योगिता भारद्वाज यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी हौदात कुजलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळून आला. अधिक चौकशी केली असता , सदर युवकाचे नाव विशाल प्रेमानंद शेलार ऊर्फ टिल्ल्या असल्याचे समोर आले. गळा चिरून हत्या केल्याची माहिती समोर आली असून, ही हत्या नेमकी कुणी व कशासाठी केली, याचा तपास पोलीस करीत आहेत. मृतक हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे.
संशयास्पद स्थितीत आढळला युवकाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 10:57 AM