वाशिम : कोणताही अधिकृत वैद्यकीय परवाना नसताना किन्हीराजा (ता.मालेगाव) येथे दवाखाना थाटून रुग्णांवर उपचार करणाऱ्या बिस्वास नामक बोगस डाॅक्टरला १७ जुलै रोजी आरोग्य व पोलिस विभागाच्या चमूने रंगेहात पकडले. एका वर्षापूर्वीदेखील याच बोगस डाॅक्टरला पकडून गुन्हाही दाखल केला होता, हे विशेष.
किन्हीराजा येथील शांती हॉस्पीटल येथे बोगस डाॅक्टर रुग्णांवर उपचार करीत असल्याची माहिती मिळाली होती. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय समितीने पोलिसांची चमू सोबत घेऊन सोमवारी किन्हीराजा येथे धाड टाकली. यावेळी बोगस डॉक्टर बिस्वास हे अवैध वैद्यकिय व्यवसाय करताना तसेच रुग्णावर उपचार करताना आढळुन आले.
या दवाखान्यात रुग्णावर उपचार करुन त्यांना सलाईन (आय.व्हि.) लावलेले दिसुन आले. तसेच मुबलक प्रमाणात औषधी, इंजेक्शनही आढळून आले. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गतवर्षी १५ जून रोजीदेखील याच बिस्वास नामक बोगस डाॅक्टरला विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करताना तालुकास्तरीय समितीच्या पथकाने रंगेहात पकडले होते. पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल असून, न्यायालयात प्रकरणही सुरू आहे.