जिल्ह्यात सन २०२१-२२ मधील खरीप हंगामाकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याकरिता रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीसोबत करार झालेला आहे. ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर आणि कापूस या पिकांचा समावेश विमा योजनेत करण्यात आला आहे. दरम्यान, कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक स्वरूपातील असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाकडून वेळोवेळी करण्यात आले. मात्र, त्यास अद्यापपर्यंत अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात गतवर्षी ११ जुलैअखेर ३९ हजार ६१२ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला होता. यंदा याच तारखेपर्यंत हे प्रमाण काहीअंशी वाढून ४१ हजार ५६० वर पोहोचले आहे. मात्र, कर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग अगदीच कमी असून, तो वाढविण्याचे मोठे आव्हान कृषी विभागाला पेलावे लागणार आहे.
....................
४,६२,००० हेक्टर
जिल्ह्यात पेरणीखालील एकूण क्षेत्र
३१,०९४ हेक्टर
आतापर्यंत विमा संरक्षित क्षेत्र
४,३०,९०६
पीक विमा संरक्षण नसलेले क्षेत्र
२८०६
विमा उतरविलेले कर्जदार शेतकरी
४०,०१५
विमा उतरविलेले बिगर कर्जदार शेतकरी
..............
गतवर्षी २ लाख ७१ हजार शेतकऱ्यांचा सहभाग
गतवर्षीच्या खरीप हंगामात २ लाख ७१ हजार शेतकऱ्यांनी १ लाख ९२ हजार ८२ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचा विमा उतरवून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला होता. त्यातुलनेत यंदा किमान आतापर्यंत तरी विमा योजनेस म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
.........................
कोट :
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळण्याकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजना अत्यंत फायदेशीर आहे. जिल्ह्यातील सर्व महसुली मंडळांना लागू असणाऱ्या या योजनेत शेतकऱ्यांनी विनाविलंब सहभागी व्हायला हवे. सोमवारपासून केवळ चार दिवस शिल्लक असल्याने विमा हप्ता भरून सहभाग निश्चित करावा.
- शंकर तोटावार
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम