राज्यभरात कुठेही अवैध गर्भपात घडवून आणला जात असेल तर त्याची माहिती जिल्हास्तरावरील ८४५९८१४०६० या हेल्पलाइन क्रमांकावर द्यावी. संबंधिताचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन करण्यात आले होते. त्याच्या काहीच दिवसांत, १८ ऑगस्ट रोजी हेल्पलाइन क्रमांकावर एका व्यक्तीने संपर्क करून रमेश चित्रपटगृहानजीक डॉ. शशिकांत सारसकर यांच्या दवाखान्यात अवैध गर्भपात घडवून आणला जात असल्याची गोपनीय माहिती कळविली. त्याआधारे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या चमूने डॉ. सारसकर यांच्या दवाखान्याची अचानक तपासणी केली असता एका महिलेवर गर्भपातासाठी अवैधपणे उपचार केले जात असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून वाशिम शहर पोलिसांनी डॉ. सारसकर व बोगस डॉक्टर विलास ठाकरे या दोघांना अटक केली. १८ ते २३ ऑगस्ट यादरम्यान दोघांनाही पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरून २४ ऑगस्ट या एका दिवसाच्या पोलीस कोठडीत वाढ झाली होती. त्यानंतर दोघांचीही जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली, अशी माहिती तपास अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक सागर दानडे यांनी दिली.
.................
बाॅक्स :
हेल्पलाइन क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन
जिल्ह्यात कुठेही गर्भलिंग तपासणी होत असल्यास त्याची माहिती प्राप्त होण्यासाठी ८४५९८१४०६० हा स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. गोपनीय माहिती अथवा तक्रार नागरिकांना या क्रमांकावर पाठविता येईल. तक्रारकर्त्यांची नावे गोपनीय ठेवण्यासोबतच संबंधितास १ लाख रुपयांचे बक्षीसही देण्यात येईल. तरी हेल्पलाइन क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी केले.