लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा लाड (वाशिम) - कारंजा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या भडशिवणी येथे दोघांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. इतर पाच जणांना डेंग्यूसारखी लक्षणे आढळल्याने गावकºयांमधून भीती व्यक्त होत आहे. स्थानिक आरोग्य विभागामार्फत गावात उपाययोजना सुरू केल्या असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे भडशिवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ प्रविण गावंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.भडशिवणी येथील एका सात वर्षीय मुलाला किडनीचा त्रास असल्याने त्याला उपचाराकरीता अमरावती येथील रूग्णालयात भरती केले होते. तेथेच त्याला डेंग्यूची लागण झाली व तो गावात आल्यानंतर गावातीलच एका २० वर्षीय युवकालाही डेंग्यूची लागण झाली, असे सांगितले जात आहे. काही जणांना तीव्र स्वरूपाचा ताप, मळमळ, उलटी, सर्दी व डोकेदुखी अशी लक्षणे आढळून आल्याने गावकºयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. दोघांच्या रक्ताची तपासणी केली असता, रक्ताच्या नमुन्यात डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ८ ते २४ वर्षे वयोगटातील अन्य पाच जणांना डेंग्यूसदृश लक्षण आढळून आली असून, त्यांच्यावरही खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. सदर परिस्थिती संदर्भात भडशिवणी येथील आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण गावंडे यांच्याशी संपर्क साधला असता दोघांना डेंग्यूची लागण झाल्याचे त्यांनी सांगितले. गावातील इतरांना लागण होवू नये म्हणून गावातील २५० घरी टॅमिफॉस औषधी ही साठवणूक केलेल्या पाण्यात टाकण्यात आले. शिवाय धूर फवारणीही करण्यात आली. गावातील नागरिकांच्या मनात डेंग्यूविषयी भितीचे वातावरण निर्माण झाले. ते दुर करण्यासाठी डेंग्यूची लक्षणे, त्यासाठी घ्यावयाची काळजी, याबाबत जनजागृती केली असून, सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे डॉ. गावंडे म्हणाले.
भडशिवणी येथे दोघांना डेंग्यूची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 5:50 PM