- संतोष वानखडे वाशिम : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या निवडणूक निकालाने काँग्रेस आघाडीवर चिंतनाची वेळ आणली असून, शिवसेना-भाजपा युतीच्या गोटात उत्साह निर्माण केला. या निवडणूक निकालाचे आगामी विधानसभा तसेच जिल्हा परिषद निवडणुकांवर काय परिणाम होतील, यापासून कोणता बोध घ्यावा या अनुषंगाने राजकीय क्षेत्रात चर्चा रंगू लागल्या आहेत.यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर १ लाख १९ हजार ९३९ मतांची आघाडी घेत शिवसेनेचा गड पाचव्यांदा कायम राखला आहे. निवडणुकीदरम्यानचे विरोधकांचे सर्व अंदाज चुकीचे ठरवित यवतमाळ-वाशिम मतदारसंघ हा शिवसेनेचा अभेद्य गड असल्याचे गवळी यांच्या विक्रमी मताधिक्क्याने सिद्ध केले आहे. जिल्ह्यातील वाशिम विधानसभा मतदारसंघात २४ हजाराची तर कारंजा विधानसभा मतदारसंघात ३६३४ मतांची आघाडी घेत आगामी विधानसभा निवडणुक ही काँग्रेस आघाडीसाठी कठीण असल्याचे अप्रत्यक्षरित्या सुतोवाचही केले. शिवसेनेच्या विजयापेक्षा काँग्रेस आघाडीच्या दारूण पराभवामागील कारणीमिमांसेसंदर्भात राजकीय क्षेत्रात चर्चा झडत आहेत. चार, पाच महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत; त्याचप्रमाणे जिल्हा परिषद निवडणूक केव्हा लागेल, याचाही नेम नाही. ऐनवेळी कोणताही धोका नको म्हणून लोकसभा निवडणुकीतील मतदारांचा हा उत्स्फुर्त प्रतिसाद कायम ठेवण्याच्या दृष्टिने सेना, भाजपा पदाधिकारी लवकरच कामाला लागतील, असे विश्वसनीय सूत्राने सांगितले. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी काँग्रेसतर्फे लवकरच बैठक बोलावली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. लोकसभा निवडणुकीत कुठे कमी पडलो, मतदारांची नाडी ओळखण्यात कुठे चुक झाली याचे चिंतन करण्याबरोबरच या पराभवातून सावरण्यासाठी काँग्रेस आघाडीने आतापासूनच ‘ग्राऊंड लेव्हल’वर हालचाली कराव्या, असा सूरही काँग्रेसमधून उमटत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास दाखवत मतदारांनी परत एकदा शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवार भावना गवळी यांनी प्रचंड मताधिक्क्याने निवडून दिले आहे. आगामी निवडणुकीतही मतदारांचा कौल हा भाजपा सरकारने केलेल्या विकासाच्या बाजूनेच राहिल.- राजेंद्र पाटणीजिल्हाध्यक्ष, भाजपायवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. पराभवामागील कारणीमिमांसा केली जाईल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काँग्रेसच्यावतीने लवकरच मंथन, चिंतन केले जाईल.-अॅड. दिलीपराव सरनाईक,जिल्हाध्यक्ष, काँग्रेस