मानोरा येथील पशुचिकित्सा व्यावसायी संघटनेने पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पशुसंवर्धन विभागातील पंचायत समिती स्तरावर कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांचे अस्थापना तथा आहरण, संवितरण अधिकार सध्या असलेल्या कार्यपद्धतीनुसारच गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी यांच्याकडे पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यासह इतर विविध स्वरूपातील प्रश्न तत्काळ निकाली काढण्यात यावे, याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात आला; मात्र त्याची कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळे अखेर राज्य संघटनेच्या आदेशावरून १६ जूनपासून जनावरांचे लसीकरण थांबविण्यात आले. याशिवाय सर्व प्रकारची ऑनलाइन कामे बंद करण्यात आली असून आढावा बैठकांना कोणीही हजर राहणार नाही, असे ठरविण्यात आले आहे. २५ जून रोजी जिल्ह्यातील सर्व आमदारांना मागण्यांचे निवेदन सादर करणार आहोत. त्यानंतरही प्रश्न सुटले नाहीत तर १६ जुलैपासून काम बंद आंदोलन केले जाईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. एन.व्ही. डेरे, उपाध्यक्ष डॉ. एस.जी. खोडके, सचिव डॉ. एम.एस. रवणे, डॉ. आर.जी. राठोड, डॉ. के.टी. जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जिल्ह्यात जनावरांच्या लसीकरणास ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:28 AM