यावेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री देसाई म्हणाले, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची संख्या लक्षात घेऊन जिल्ह्यात आणखी कोविड केअर सेंटर व इतर आवश्यक सुविधा उभारणे आवश्यक असल्यास त्यादृष्टीने तातडीने नियोजन करावे. कोरोना बाधितांवर उपचारासाठी ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात लिक्विड ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याची कार्यवाही गतिमान करावी. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत सर्व ठिकाणी पुरेसा औषधी साठा उपलब्ध ठेवावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.
.......................
लसीकरणावर विशेष भर द्या
कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती देणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. विशेषतः ग्रामीण भागात लसीकरणाविषयी जनजागृतीवर भर देवून लोकांना लसीकरणाची माहिती द्यावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.