वाशिम : स्तनपान सप्ताहाला १ आॅगस्टपासून प्रारंभ झाला असून, जिल्हा सामान्य रुग्णालयात आहार तज्ज्ञ डॉ. सुनिता पी. लाहोरे यांनी मातांना स्तनपानसंदर्भात मार्गदर्शन केले. आॅगस्ट महिन्यातील पहिला आठवडा हा जागतिक स्तरावर स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. या सप्ताहाचा प्रारंभ झाला असून, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात रुग्णालयाच्या आहार तज्ज्ञ डॉ. सुनिता लाहोरे यांनी स्तनपानासंदर्भात समज, गैरसमज, स्तनपानाचे महत्व मातांना पटवून दिले. सद्यस्थितीत कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे फार भयावह व संभ्रमावस्था निर्माण करणारी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत आापण आपल्या नवजात बालकाला स्तनपान द्यायचे की नाही याविषयी काही पालकांमध्ये शंका आहेत, भिती आहे की, आपल्या बाळाला तर हा आजार होणार नाही ना? अशा शंका आहेत. स्तनपानासंदर्भात कुणीही शंका बाळगू नये, असे आवाहन त्यांनी केले. स्तनपानाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. स्तनपान बाळाला दिल्याने बाळ व मातेलाही फायदा होतो, आईच्या दुधात बाळासाठीच्या वाढीसाठी लागणारी सर्व पोषकतत्व योग्य प्रमाणात असतात. त्यामुळे आईच्या दुधावर वाढणारे बाळ हे स्वस्थ, क्रियाशिल, सुदृढ व निरोगी असते, असे आहारतज्ज्ञ डॉ. लाहोरे यांनी मातांना सांगितले.
स्तनपान सप्ताहाला वाशिम जिल्ह्यात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 5:54 PM