वाशिम : तक्रारदार आणि त्यांच्या वडीलाच्या नावे घरकूल मंजूर करून देण्यासाठी २० हजाराची लाच मागणाºया मालेगाव पंचायत समितीच्या उपसभापतीच्या पतीसह अन्य एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने ६ जानेवारी रोजी मालेगाव पंचायत समिती येथून ताब्यात घेत गुन्हे दाखल केले. उपसभापतीचे पती प्रल्हाद निवृत्ती घोडे (५३) रा. पांगरी नवघरे व संतोष तुळशीराम खुळे (३३) रा. वाकळवाडी अशी आरोपीची नावे आहेत.मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील ३६ वर्षीय इसमाच्या तक्रारीनुसार, आरोपी प्रल्हाद घोडे हे मालेगाव उपसभापतींचे पती असून तक्रारदार व त्यांचे वडिलांचे नावे पंचायत समिती मालेगाव येथून घरकुल मंजूर करून देण्याकरिता २० हजार रुपये लाचेची मागणी केली. घरकुलाचे काम करून घेण्यापूर्वी दहा हजार आणि काम करून दिल्यानंतर १० हजार रुपये असे ठरले होते. काम करून देण्यापूर्वी दहा हजार रुपयांमधून चार हजार रुपये देण्याचे आरोपी खोडे यांनी तक्रारदारास सांगितले. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविल्याने ५ जानेवारी रोजी पडताळणी करण्यात आली. ६ जानेवारी रोजी पंचायत समिती मालेगाव येथे सापळा रचला असता, प्रल्हाद घोडे यांनी चार हजाराची लाच रक्कम खासगी इसम संतोष खुळे याला देण्यास सांगितले. खुळे याने चार हजार रुपयाची लाच स्विकारताच दोन्ही आरोपीला रंगेहात पकडण्यात आले. मालेगाव पोलीस स्टेशनला दोन्ही आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, पोलिस उपअधिक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुजित कांबळे, पोलीस निरीक्षक ममता अफुने व चमूने केली.
घरकुलासाठी पंचायत समिती उपसभापतीच्या पतीने मागितली लाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2022 5:10 PM