वाशिम - ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डमध्ये वडिलांच्या मृत्यूची नोंद करण्यासाठी मुलाला हजार रुपयांची लाच मागणाºया कोळंबी (ता.मंगरूळपीर) येथील ग्रामसेवकास लाचलुचपत विभागाने २३ फेब्रुवारीला मंगरूळपीर येथील शासकीय विश्रामगृहाजवळ रंगेहाथ अटक केली.याबाबत प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराच्या वडिलांनी सन २०१७ मध्ये शौचालय बांधकाम योजनेंतर्गत कोळंबी ग्रामपंचायतीत अर्ज केला होता. मात्र, यादरम्यान वडिलांचा मृत्यू झाल्याने शौचालयाचे अनुदान आईच्या नावावर वळते करायचे होते. त्यासाठी वडिलांच्या मृत्यूची नोंद ग्रामपंचायतीत आवश्यक असल्याने तक्रारदाराने कोळंबी येथील ग्रामसेवक जीवन शिंदे यांची भेट घेतली असता, शिंदे याने आपणास हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार २३ फेब्रुवारीला दाखल झाली. त्यावरून लाचलुचपत विभागाने पडताळणी केली. तसेच सापळा रचला असता, शिंदेने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्विकारल्याचे निष्पन्न झाले. यावेळी ग्रामसेवक शिंदे यास शासकीय विश्रामगृहासमोरील रोडवर लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक करून तयच्याविरूद्ध कलम ७, १३ (१) (ड) कलम १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कार्यवाहीत लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक सुनिता नाशिककर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक आर.व्ही.गांगुर्डे, नंदकिशोर परळकर, रामकृष्ण इंगळे, नितीन टवलारकर, अरविंद राठोड आदिंनी सहभाग नोंदविला.
लाचखोर ग्रामसेवक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात! मंगरूळपीर येथील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 3:00 PM