वाशिम: सात- बारा देण्यासाठी ३१00 रुपयांची लाच घेताना तलाठी व त्याच्या भावाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही घटना ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता रिसोड तालुक्यातील केनवड बस स्थानकावर घडली. रिसोड तहसील अंतर्गत येणार्या कळमगव्हाण साजामधील नंधाना येथे विनोद महेंद्रकुमार वर्मा तलाठी म्हणून कर्तव्यावर आहेत. वर्मा यांच्याकडे तक्रारदाराने पत्नी व मुलाच्या नावे केलेल्या शेतीची फेरफार रजिस्टरला नोंद घेऊन सात-बाराची रीतसर मागणी केली. यावेळी तलाठी वर्मा याने तक्रारदाराला मनोज महेंद्रकुमार वर्मा (तलाठय़ाचा लहान भाऊ) याला भेटण्यास सांगितले. तक्रारदाराने मनोज वर्मा याची भेट घेतली असता, सात-बारा देण्यासाठी ३१00 रुपयांची मागणी त्याने केली. याबाबत तक्रारदाराने वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे पडताळणी करून ७ ऑक्टोबर रोजी केनवड येथील गजानन हॉटेलच्या परिसरात एसीबीचे पोलीस निरीक्षक एन.बी. बोर्हाडे व त्यांच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तलाठी वर्मा याने त्याचा भाऊ मनोज यास तक्रारदाराकडून पैसे घेण्यासाठी पाठविले. बसस्थानकाजवळ ३१00 रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.
लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात
By admin | Published: October 08, 2015 1:54 AM