वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील काही मार्गावर अगदी रस्त्यालगतच विटभट्ट्या लावल्या जात आहेत. या विटभट्ट्यांचा वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा त्रास होत असून, भट्टीच्या धुरामुळे अपघाताची भिती निर्माण झाली आहे.
मंगरुळपीर तालुक्यात सध्या विटभट्टी व्यवसाय तेजीत सुरू आहे. मानोरा मार्गावर, तर विटभट्ट्यांचे प्रमाण मोठे असल्याचे दिसत आहे. या व्यवसायासाठी प्रशासनाने माती उत्खननाला परवानगी दिली आहे. तथापि, विटभट्टी लावताना विटभट्टी मालकांनी कोणतेच पर्यावरणविषयक निकष पाळलेले दिसून येत नाहीत. यामुळे याचा त्रास मात्र सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. मंगरुळपीर तालुक्यात मानोरा मार्गावर औद्योगिक वसाहतीपासून थेट मानोरा तालुक्याच्या हद्दीपर्यंत रस्त्यालगतच विटभट्टया लावण्यात आल्या आहेत. या विटभट्यांतून बाहेर पडणारा धुर वाºयामुळे रस्त्यावर येत आहे. या धुरामुळे काही वेळपर्यंत रस्त्यावरचा पुढील भागही दिसणे कठीण होते. एखादवेळी दाट धूर असल्यास परस्परविरुद्ध दिशेने येणाºया वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच या धुरामुळे प्रवाशांच्या डोळयांना देखील त्रास होत आहे. विटभटटी लावताना मात्र रस्त्यापासून अंतर ठेवून लावण्याची मानसिकता विटभट्टी मालक ठेवत नसल्याने रस्त्यावरून येणाऱ्या जानाऱ्या वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय धुरामुळे पर्यावरणावरही मोठा विपरित परिणाम होत आहे. या विटभट्ट्यांसाठी माती उत्खननाची परवागी देण्यात आली असली तरी, निर्धारित नियमानुसारच उत्खनन होते काय, याची तपासणी मात्र प्रशासन करताना दिसत नाही. विटभट्टी हा व्यवसाय पारंपरिक व्यवसायात येत असल्याने याला शासनाने विविध प्रकारची मुभा दिली आहे. मात्र हा व्यवसाय करणारे आता उद्योजक झाले आहेत. विटभट्टीतून बाहेर पडणारी विट ही कोट्यवधींची उलाढाल होत असलेल्या बांधकाम क्षेत्राशी निगडीत आहे. यामुळे विट ही बांधकाम क्षेत्रातील महत्वाचे अंग आहे. मात्र आजही हा व्यवसाय पारंपारीक पद्धतीत मोडत असल्याने विटभट्टीला परवानगीची गरज लागत नाही. उलट नाममात्र रॉयल्टी आकारून माती उत्खननालाच परवानगी महसुल विभागाकडून देण्यात येते. यामुळे तालुक्यात परवानगी देण्यात आलेल्या विटभट्ट्यांची माहिती उपलब्ध होत नाही. यामुळे प्रत्यक्षात अनेक विटभट्टया बिनबोभाटच सुरू असल्याचीही शक्यता आहे.